Sex Determination Case | स्वप्निल पाटीलसह सहाजणांवर गुन्हा

गर्भलिंग निदान प्रकरण : दोन महिला एजंटांना अटक; स्वप्निलसह चौघे मोटारीतून पसार
Sex Determination Case |
Sex Determination Case | स्वप्निल पाटीलसह सहाजणांवर गुन्हा
Published on
Updated on

कोल्हापूर : कळंबा येथील थ्री स्टार लॉजिंगवर सुरू असलेल्या बेकायदा गर्भलिंग केंद्रावर करवीर पोलिसांनी रविवारी सायंकाळी छापा टाकून, मुख्य सूत्रधार बोगस डॉक्टर स्वप्निल केरबा पाटीलसह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. स्वप्निल पाटील, किरण चव्हाण, संतोष कोळी, लॉज मालक, चालक पसार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी दोन महिला एजंट मनीषा दिनकर कांबळे (वय ३७, रा. सावर्डे पाटण, ता. राधानगरी), आश्विनी गजानन शिंदे (वय ३८, रा. कसबा वाळवे, ता. राधानगरी) यांना अटक केली असून, दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

थ्री स्टार लॉजिंगमधील रूम नंबर १०२ मध्ये बेकायदेशीर गर्भलिंग निदान सुरू असल्याची माहिती करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मिळाली होती. यानुसार रविवारी सायंकाळी पोलीस, आरोग्य विभागाच्या संयुक्त पथकाने छापा टाकला. याबाबतची फिर्याद डॉ. उत्तम मोहन मदने यांनी दिली. जिल्ह्यासह सीमाभागात स्वप्निल गर्भलिंगचे रॅकेट चालवित असल्याची माहिती समोर आली आहे.

मोटारींचा पाठलाग करून पकडले

स्वप्निल पाटील दोन एजंटांसह पसार झाला; मात्र पोलिसांच्या पथकाने मनीषा कांबळे, आश्विनी शिंदे यांच्यासह दोन गर्भवतींना ताब्यात घेतले. गर्भवती महिलांनी चौकशीत एजंट महिलांकरवी स्वप्निलकडे गर्भलिंग तपासणी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी इस्पुर्लीपर्यंत पाठलाग करून या महिलांना ताब्यात घेतले.

महिलांना भरघोस कमिशन

गर्भलिंग निदानासाठी पेशंट घेऊन येणाऱ्या एजंट महिलांना स्वप्निल भरघोस कमिशन देत होता. रविवारी अटक केलेल्या दोन महिलांच्या ताब्यातून पोलिसांनी चार मोबाईल आणि २१ हजारांची रोकड जप्त केली. यावरून त्यांना मिळणाऱ्या कमिशनचा अंदाज पोलिसांनी बांधला.

लॉज मालक, चालक गायब

स्वप्निल पाटील हा गर्भलिंग निदानमधील सराईत आरोपी असून, त्याच्यावर जिल्ह्यात चार गुन्हे दाखल आहेत. त्याने मागील वर्षी एका रो हाऊसचा, तर त्यापूर्वी शेतातील घराचा गर्भलिंग निदानासाठी वापर केला होता. आता त्याने नवीन शक्कल लढवत लॉजवरच गर्भलिंग निदान केंद्र थाटले होते. लॉज मालकास आणि चालकास यासाठी भरघोस भाडेही दिले होते. या प्रकरणात पोलिसांनी लॉज मालकासह चालकावर गुन्हा दाखल केला असून, लॉज मालक गायब झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news