

बांबवडे : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याची तहान भागवणारी वारणा नदी, त्यावर उभारलेले चांदोली धरण आणि परिसरात मुबलक जलस्रोत असतानाही शितूर-वारूण गावातील नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. “धरण शेजारी, पण घसा कोरडा” अशी परिस्थिती सध्या गावात निर्माण झाली असून ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
वसंत सागर प्रकल्पाच्या परिसरातील शितूर-वारूण गावात गेल्या काही महिन्यांपासून पाणीटंचाईचे संकट अधिकच गडद झाले आहे. गावाजवळून वारणा नदी वाहते, तसेच चांदोली धरणही अगदी जवळ आहे. मात्र, तरीदेखील गावातील अनेक वाड्या-वस्त्यांमध्ये नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. महिलांना दूरवरून पाणी आणावे लागत असून काही भागात दोन ते तीन दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे हाल वाढले आहेत.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावात जलस्रोतांची कमतरता नसून नियोजनाचा अभाव आणि पाणीपुरवठा व्यवस्थेतील त्रुटींमुळे ही समस्या निर्माण झाली आहे. याबाबत ग्रामपंचायत आणि संबंधित विभागांकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे उन्हाच्या तीव्रतेसोबतच पाण्याच्या समस्येने नागरिक त्रस्त झाले आहेत.
पहाटेपासून महिलांना हंडे घेऊन पाण्यासाठी रांगा लावाव्या लागत आहेत. जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनत चालला असून शेतकरी वर्ग चिंतेत आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
वारणा नदी आणि चांदोली धरणाच्या पाण्यावर संपूर्ण परिसर अवलंबून असताना, शितूर-वारूणसारख्या गावात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणे हे प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे ठरत आहे.