

कोल्हापूर : बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि जंकफूडमुळे हृदयविकाराच्या प्रमाणात भयावह वाढ होत आहे. अशात धक्कादायक बाब म्हणजे अत्यंत थंड तापमानाचा घाला हृदयावर होत असल्याचे ‘एनपीजे नॅचरल हजार्डस्’ या आंतरराष्ट्रीय जर्नलमधील संशोधन अहवालातून समोर आले आहे. हिवाळ्यात तापमान कमी झाल्याने हार्ट अटॅक आणि इतर हृदयविकारांचे प्रमाण लक्षणीय वाढल्याचे वैद्यकीय निरीक्षणांमधूनही समोर आले आहे. यंदाच्या हिवाळ्यात राज्यात तापमानात कमालीची घट झाली आहे. यामुळे थंडीत थोडी काळजी घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
या संशोधनानुसार तापमानातील टोकाचे चढ-उतार शरीराच्या नैसर्गिक संतुलनावर परिणाम करतात. थंडीमध्ये रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, रक्तदाब वाढतो आणि हृदयाला अधिक मेहनत घ्यावी लागते, तर अत्यंत उष्णतेमध्ये शरीरातील द्रव पातळी कमी होऊन हृदयावर अतिरिक्त ताण निर्माण होतो. या दोन्ही परिस्थितींमध्ये हार्ट अटॅकसह इतर हृदयविकारांचा धोका वाढतो, असे संशोधकांचे निरीक्षण आहे. संशोधनानुसार तापमान 15 अंशांच्या खाली गेले की, हृदयविकाराचा धोका वाढू शकतो, तर 10 अंशांच्या खाली तो अधिक गंभीर ठरतो.
...यामुळे येतोय हार्ट अटॅक
थंड हवामानात उष्णता टिकवण्यासाठी रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. या प्रक्रियेला व्हॅसो कन्स्ट्रिक्शन म्हणतात. याच काळात रक्त अधिक घट्ट होण्याची शक्यता वाढते. ही स्थिती हार्ट ॲटॅकला कारणीभूत ठरते.
संसर्गजन्य आजार अन् मानसिक ताण...
हिवाळ्यात फ्लू, सर्दी, श्वसनसंस्थेचे संसर्ग वाढतात. अशा संसर्गांमुळे शरीरात दाह वाढतो, जो रक्तवाहिन्यांमधील प्लॅक अस्थिर करून अचानक ब्लॉकेज निर्माण करू शकतो. त्याचबरोबर हिवाळ्यात वाढणारा मानसिक ताण, नैराश्य, दिनचर्येतील बदल यामुळे कॉर्टिसोल आणि ॲड्रेनालिनसारखे ताणतणावाचे हार्मोन्स वाढतात, जे हृदयाचे ठोके आणि रक्तदाब वाढवतात.