

कोल्हापूर : कोल्हापूर शहर आणि परिसरात गुंडागर्दी करून दहशत निर्माण करणार्या कावळा नाका परिसरातील ‘एसके’ गँगवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या गँगचा म्होरक्या साजन कुचकोरवी याच्यासह 17 सराईत गुन्हेगारांना पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी गुरुवारी एका वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार केले. या कारवाईनंतर हातकणंगले तालुक्यातील वडगाव येथील दोन टोळ्यांतील गुन्हेगारही पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती आहे.
पोलिस अधीक्षक गुप्ता यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे शहर आणि जिल्ह्यातील गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकाच वेळी टोळीच्या म्होरक्यासह 17 जणांना तडीपार करण्याची ही पहिलीच मोठी कारवाई आहे. यामुळे शहरातील इतर टोळ्यांचे म्होरके आणि साथीदारांचे धाबे दणाणले आहेत.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर आणि शाहूपुरीचे निरीक्षक संतोष डोके यांनी सांगितले की, सर्व संशयितांना गुरुवारी सकाळी ताब्यात घेऊन त्यांची सांगली जिल्ह्यात रवानगी करण्यात आली आहे.
म्होरक्या साजन अशोक कुचकोरवी, बालाजी चंद्राप्पा कुचकोरवी, देवा ऊर्फ देवेंद्र काळू जोंधळे, विशाल विजय जगदाळे, आशिष कन्हैया पवार, संजय नागाप्पा कुचकोरवी, रोहित राजू जोंधळे, संग्राम दीपक पवार, अजय दुर्गा माने, रोहित गोरखनाथ माने, श्रीकांत ऊर्फ विवेक दशरथ कुचकोरवी, करण यल्लाप्पा कुचकोरवी, युवराज नागेश चौगुले, सुमित यल्लाप्पा माकडवाले, सिद्धार्थ संतोष कुचकोरवी, अलोक राजू कुचकोरवी आणि दीपक मलिक माने. (सर्व रा. कावळा नाका, शिवाजी पार्क, कोल्हापूर).
म्होरक्या साजन कुचकोरवी आणि त्याच्या साथीदारांवर खंडणी, गर्दी मारामारी, खुनाचा प्रयत्न, संघटित गुन्हेगारीद्वारे दहशत निर्माण करणे, बेकायदा शस्त्रे बाळगणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या टोळीच्या तडीपारीचा प्रस्ताव शाहूपुरी पोलिसांनी पोलिस अधीक्षकांकडे सादर केला होता.
पोलिस अधीक्षकांसमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी संशयितांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली होती. सुनावणीअंती या टोळीने आपल्या गुन्हेगारी कृत्यांतून समाजात दहशत निर्माण केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 च्या कलम 55 अन्वये म्होरक्यासह सर्व साथीदारांवर एका वर्षासाठी तडीपारीची कारवाई करण्यात आल्याचे आदेशात नमूद आहे.