

कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातून गांधी मैदान ते खरी कॉर्नर रोडवर सात तरुणांनी एकाचा पाठलाग करून खुनी हल्ला केला. हर्षवर्धन उमेश मोरे (27, रा. ए वॉर्ड, संध्यामठ गल्ली, शिवाजी पेठ) असे जखमीचे नाव आहे. जुना राजवाडा पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर गुरुवारी (5 जून) रात्री 9.30 च्या सुमारास ही थरारक घटना घडली. घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान, जीव वाचवण्यासाठी या तरुणाने एका इमारतीच्या दुसर्या मजल्यावरून उडी घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
याप्रकरणी मोरे याने दिलेल्या फिर्यादीनुसार ओम आवळे, मनोज उबाळे, यश माने, ऋतिक साठे, वैभव कुरणे, राज झगडे यांच्यासह एक अनोळखी व्यक्ती यांच्याविरुद्ध जुना राजवाडा पोलिस ठण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप पोलिसांनी कुणालाही अटक केली नाही.
काही दिवसांपूर्वी संभाजीनगर येथील इंदिरा सागर चौकात जुन्या वादातून मोरे व वैभव कुरणे यांच्यात भांडण झाले होते. त्यानंतर 5 जूनच्या रात्री मोरे हा मित्रासोबत मोटारसायकलवरून घरातून कामानिमित्त खरी कॉर्नरकडे जात होता. त्यावेळी संशयित आरोपींनी त्याच्या मोटारसायकलच्या आडवी मोटारसायकल घालून त्यांना थांबविले. आवळे याने मोरे याला वैभव कुरणे बरोबर भांडण केलेला तूच का? असे म्हणून शिवीगाळ केली. त्यानंतर आवळे याच्यासह इतरांनी त्याला शिविगाळ करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
संशयित आरोपींनी बॅटने त्याच्या पायावर मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी मोरे हा जीव वाचविण्यासाठी पळून जाऊ लागला. आरोपींपासून सुटका करून घेण्यासाठी तो एका इमारतीत घुसला. दुसर्या मजल्यावर पळत गेला. मात्र तेथेही मारेकरी येतील या भीतीने त्याने इमारतीच्या दुसर्या मजल्यावरून उडी टाकली. त्यात तो पुन्हा गंभीर जखमी झाला. घटनास्थळी संशयित आरोपींनी दगडांनी त्याच्या मोटारसायकलची तोडफोड केली. घटनेनंतर मोरे याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले.