

कोल्हापूर : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपर फोडणाऱ्या टोळीने सेट परीक्षेचाही पेपर फोडल्याची कुबली दिली आहे. त्यामुळे राज्य पात्रता परीक्षाही वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी प्रकरणाची माहिती घेऊन चौकशी करण्याचे जाहीर केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. दुसरीकडे पात्र उमेदवारांनी राज्यव्यापी आंदोलनाची आक्रमक भूमिका घेतली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत महाराष्ट्र व गोवा राज्यांसाठी राज्य पात्रता परीक्षेचे (सेट) दरवर्षी आयोजन केले जाते. जून-2025 च्या सेट परीक्षेत दोन्ही पेपरला सुमारे 90 हजार 366 विद्यार्थी बसले होते. यातून सुमारे 6 हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दरवर्षी 5 ते 6 टक्के निकाल लागतो. मात्र, गेल्या चार वर्षांपासून नानाविध कारणाने परीक्षेतील गोंधळ समोर येत आहे. त्यात सर्वाधिक महत्त्वाचा घोळ म्हणजे परीक्षेपूर्वीच पेपर फुटण्याचे प्रकार घडत आहेत. यासंदर्भात 11 जून 2025 रोजी एका यू ट्यूब चॅनेलवरून ‘सेट’ पेपर संदर्भातील संभाषणाचे कॉल रेकॉर्डिंग समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते.
पुणे विद्यापीठ प्रशासनाने खोटी माहिती पसरविल्याप्रकरणी यू ट्यूबरविरुद्ध गुन्हा नोंद करून पेपर फुटी संबंधित सर्व आरोप फेटाळून लावले. याबाबतचे जाहीर प्रकटन पुणे विद्यापीठाने 11 जून रोजी काढले आहे. काही ठिकाणी एकाच घरातील तीन-चार जण एकाच वेळी ‘सेट’ परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. सांगली जिल्ह्यातील एका संस्थाचालकाने निकालाची तारीख समजताच भरती प्रक्रिया नव्याने राबवून नातेवाईकास संस्थेत नोकरीला घेतल्याचे समजते.
दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगूड (ता. कागल) येथे ‘टीईटी’ परीक्षेचा पेपर फोडण्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात अटक केलेल्या संशयित आरोपींनी कबुली देत ‘सेट’ परीक्षेचा पेपर फोडल्याचे पोलिस चौकशीत सांगितले. यामुळे सेट परीक्षा विभाग चौकशीच्या भोवऱ्यात सापडला आहे. ज्या यूट्यूब लिंकवरून सेट परीक्षा पेपर फोडण्याची प्रक्रिया व्हायरल झाली होती ते रेकॉर्डिंग पुन्हा तपासून संबंधितांना ताब्यात घ्यावे, अशी मागणी पात्र उमेदवारांमधून होत आहे.
दरम्यान, यासंदर्भात पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मागील ‘सेट’ परीक्षेचा पेपर फुटला नसल्याचे सांगितले. ‘सेट’ परीक्षेला विषयाप्रमाणे पेपर असतात. याची माहिती घेत प्रकरणाची शहानिशा करून त्यानंतर चौकशी करण्यात येईल, असेही ते म्हणाले.