Hasan Mushrif | दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर पक्षात चर्चाच नाही

वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ; त्यांच्या मनात असेल तर आपण नाही म्हणू शकत नाही
Minister Hasan Mushrif
Hasan Mushrif | दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर पक्षात चर्चाच नाही(File photo)
Published on
Updated on

कोल्हापूर : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रिकीकरणावर आमच्या पक्षात कधी चर्चा झालेली नाही किंवा शरद पवार राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांची या विषयावर एकत्र बैठक झाली आणि त्यात चर्चा झाली असे नाही. यासंदर्भात शरद पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आपल्याशी बोलले होते; परंतु अधिकृत काही ठरलेले नाही, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत शरद पवार यांनीच हा अपघात आहे, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे यासंदर्भातील आरोपांवर आताच भाष्य करणे घाईचे होईल; परंतु याची चौकशी झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.

मुश्रीफ म्हणाले, महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसदर्भात अजित पवार आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाली होती, हे स्पष्ट आहे. अनेक ठिकाणी कुणाला घड्याळावर लढायचं असेल तर घड्याळावर लढा, कुणाला तुतारीवर लढायचं असेल तर तुतारीवर लढा, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला होता. शरद पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही आपणास तसे सांगितले होते; परंतु राष्ट्रवादीच्या आम्हा सर्व प्रमुख नेत्यांना घेऊन शरद पवार यांच्यासोबत कुठलीही चर्चा झालेली नाही. अजित पवार यांच्या निधनामुळे हे सगळे प्रश्न आता अनुत्तरित राहिले आहेत. जिल्हा परिषद निवडणूक झाल्यानंतर दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना राष्ट्रवादी एक करायची असेल तर आपण नाही म्हणू शकत नाही; परंतु एकत्रिकीकरणावर चर्चा झाली नाही, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

महापालिका निवडणुकीत आम्हाला अपेक्षित यश न मिळाल्याने आमची शक्ती कमी आहे. असे असले तरी आम्हाला महायुतीत योग्य न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करून मुश्रीफ म्हणाले, अजित पवार यांच्या जाण्यामुळे कार्यकर्त्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आम्ही पोरके झालो. कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. अशा वेळी सुनेत्रा पवार यांनी आपले दु:ख बाजूला ठेवून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि कार्यकर्त्यांना आधार दिला. यामुळे त्यांचे आम्ही आभारच मानतो.

पक्ष संघटित ठेवणे महत्त्वाचे

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सांभाळण्याची जबाबदारी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या कुटुंबांची आहे. पक्ष वाढविणे, त्याचे संरक्षण करणे, तो संघटित ठेवणे हे काम प्रथम करावे लागेल. त्यानंतर पुढीच्या चर्चा होत राहतील, असे मुश्रीफ यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

खांडोळीला आम्ही नावं ठेवली, पण...

महापौरपदाच्या खांडोळीला आम्ही पूर्वी नावं ठेवली. टीका केली; परंतु कार्यकर्त्यांचे समाधान करण्यासाठी आणि त्यांना एकसंध ठेवण्याकरिता पदे वाटून द्यावी लागतात. त्यामुळे किती दिवसाचा महापौर होणार यापेक्षा महापालिका प्रशासन एकसंध ठेवून काम कसे करणार हे पाहण्याची जबाबादरी तीनही पक्षांची असल्याचे मुश्रीफ म्हणाले.

आताच बोलणे घाईचे होईल!

विमान अपघात झाला की चौकशी समिती नेमली जाते. ब्लॅक बॉक्सचे विश्लेषण केले जाते. त्यानंतर कारण स्पष्ट होते. त्यामुळे हा घात की अपघात यावर बोलणे आता घाईचे होईल; परंतु याची चौकशी झाली पाहिजे, असेही मुश्रीफ म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news