

पूनम देशमुख
कोल्हापूर : शाळा म्हटली की फक्त मुलांचीच असते, असा समज आता कोल्हापुरात मोडीत निघत आहे. निमित्त ठरले आहे ते शेअर-केअर सेंटरचे. येथे ज्येष्ठांची केवळ शाळाच भरत नाही, तर त्यातून त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला एक नवी झळाळी मिळत आहे. निवृत्तीनंतरचे आयुष्य वेळ घालवणे म्हणून न जगता ते नव्याने शिकण्याचे आहे, हा विश्वास पूर्णपणे मोफत असलेल्या या केंद्राने ज्येष्ठांमध्ये निर्माण केला आहे. केवळ गप्पा मारण्याचे ठिकाण न राहता त्यांच्यासाठी हे हक्काचे व्यासपीठ ठरले आहे.
वाढत्या शहरीकरणात आणि धावपळीच्या युगात ‘एकाकीपण’ ही ज्येष्ठांसाठी मोठी समस्या बनली आहे. मात्र, कोल्हापुरात सुरू झालेला ‘शेअर-केअर सेंटर’ हा उपक्रम सध्या घरोघरी घुसमटणार्या ज्येष्ठांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरत आहे. या उपक्रमाची सुरुवात लॉकडाऊनच्या कठीण काळात झाली. एका ज्येष्ठ महिला गप्पा मारण्याच्या ओढीने डॉक्टरांना भेटायला आली, यावेळी तिच्यातील एकटेपणा या उपक्रमाची ठिणगी ठरला. सामाजिक जाणिवेतून ज्येष्ठ नागरिकांसाठी काहीतरी करण्याची संकल्पना पुढे आली आणि ‘शेअर-केअर सेंटर’ आकाराला आले.
सुरुवातीला ऑनलाईन स्वरूपात सुरू झालेला हा प्रवास आता एका उत्साही केंद्रात रूपांतरित झाला आहे. आज या केंद्रात 50 ते 89 वयोगटातील स्त्री-पुरुष आनंदाने सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय असून, अनेकजण आपल्या मनातील दुःख विसरून येथे पुन्हा एकदा बालपण अनुभवत आहेत. त्यांच्यासाठी डॉ. कल्याणी कुलकर्णी, डॉ. शैलजा करेकर, गीता हासूरकर, सुखदा आठले, सीमा कवठेकर, सुरेख खांडेकर, संजय कुलकर्णी आदी टीम त्यांना मार्गदर्शन करत असते.
मानसिक तंदुरुस्तीसाठी ब्रेन गेम्स
वाढत्या वयात स्मृतिभ्रंश किंवा विसरभोळेपणाची समस्या टाळण्यासाठी येथे विशेष ‘ब्रेन आणि माईंड गेम्स’ खेळले जातात. यामुळे ज्येष्ठांची एकाग्रता वाढून त्यांची मानसिक स्थिती सकारात्मक राहण्यास मदत होत आहे.
डिजिटल साक्षरता
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात ज्येष्ठ मागे पडू नयेत म्हणून त्यांना विशेष ‘मोबाईल वापर प्रशिक्षण’ दिले जाते. महत्त्वाचे म्हणजे, ऑनलाईन फसवणुकीपासून वाचण्यासाठी सायबर सुरक्षेचे धडेही येथे गिरवले जात आहेत. यामुळे नातवंडांकडे मदत न मागता स्वतःचे व्यवहार स्वतः करण्याकडे त्यांचा कल वाढला आहे.