

उजळाईवाडी : कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील मेट्रो हायटेक टेक्स्टाईल पार्कमधील कंपनी फोडून लाखो रुपयांच्या शिलाई मशिन आणि स्टँड चोरणार्या तिघांना थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे, जवळच्याच कंपनीतील एका सुरक्षा रक्षकानेच चोरीचा कट रचल्याचे उघड झाले आहे. त्यांच्याकडून चोरीसाठी वापरलेला ट्रक आणि साडेअठरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शफातुल्हा हबीमुल्ला खान (वय 55, रा. कुर्ला, मुंबई), विजयकुमार नारायण सिंग (वय 40, रा. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) आणि अफजल नजीबुल्ला खान (वय 33, रा. जिहे, जि. सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यापैकी अफजल हा स्क्रॅप व्यावसायिक असून ट्रकचालक आहे. कंपनीचे सेक्रेटरी आनंदा माने (रा. इचलकरंजी) यांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र करमाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शेष मोरे, प्रवीण पाटील, दीपक घोरपडे, संजय हुंबे आणि लखन सिंह पाटील यांच्या पथकाने घटनास्थळावरील माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांना बेड्या ठोकल्या.