

कोल्हापूर : नाताळची सुट्टी, भाविक आणि पर्यटकांच्या अफाट गर्दीने अंबाबाई मंदिरसह सारा परिसर सोमवारी तुडुंब भरलेला असतानाच 40 वयोगटातील एकाने सुरक्षा यंत्रणा भेदून मंदिरात पिस्तूल आणल्याने प्रचंड खळबळ उडाली. संबंधित व्यक्तीने कमरेला लटकाविलेल्या पिस्तूलचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल केल्याने सुरक्षा यंत्रणेवर नामुष्की ओढावली. पोलिस यंत्रणा हडबडली असून वरिष्ठाधिकार्यांनी तत्काळ मंदिराकडे धाव घेतली. वरिष्ठस्तरावर चौकशी सुरू केली आहे. मंदिरातील चारही प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरची यंत्रणा निष्क्रिय ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
अंबाबाई मंदिरातील सुरक्षा व्यवस्थेतील ढिसाळपणाची पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी गंभीर दखल घेत शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील यांना चौकशी करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकारामुळे सुरक्षा यंत्रणेसह अधिकार्यांची पाचावर धारण बसली होती. नाताळची सुट्टी, भाविक आणि पर्यटकांची गर्दीने अंबाबाई मंदिरासह परिसर गजबजला आहे. सोमवारी सकाळपासून दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या आहेत.अंबाबाई मंदिराच्या चारही प्रवेशद्वारावर कडेकोट सुरक्षा यंत्रणा तैनात असताना दुपारी अनोळखी व्यक्ती अंबाबाईचे दर्शन घेऊन प्रवेशद्वारातून बाहेर आला.
मंदिरातून बाहेर येताच संबंधित व्यक्तीने मंदिर प्रवेशद्वारात थांबलेले हिंदुत्ववादी कार्यकर्ते बंडा साळुंखे यांना उद्देशून अंबाबाई मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करून कमरेला लटकाविलेली पिस्तूल दाखविली. याप्रकाराने बंडा साळुखेही आश्चर्यचकित झाले. मंदिर परिसरात एव्हाना प्रमुख प्रवेशद्वारावर अत्याधुनिक पद्धतीची मेटल डिटेक्टरची यंत्रणा असतानाही बंदोबस्तावरील अधिकारी, कर्मचार्यांना पिस्तूलचा सुगावा का लागला नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मुंबईतील संबंधित बांधकाम व्यावसायिक असलेल्या भाविकाने स्वत: या घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल केल्याने केल्याने शहरात खळबळ उडाली. संबंधित व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिस अधिकार्यांसह कर्मचार्यांची धांदल उडाली. मंदिर परिरातील सीसीटीव्ही फुटेजचीही पाहणी करण्यात आली. मात्र संबंधित व्यक्ती मित्रासह मंदिर परिसरातून निघून गेल्याचे स्पष्ट झाले. रात्री उशिरापर्यंत त्यांच्याशी पोलिसांचा संपर्क झालेला नव्हता.
पिस्तूलधारकांसह साथ देणार्यांवर गुन्हे दाखल करणार : किरण लोंढे
अंबाबाई मंदिरासह परिसरात घातक शस्त्रांसह प्रवेश करणे, वावरण्यास मनाई असतानाही पिस्तूलसह मंदिरात प्रवेश करणे, सार्वजनिक ठिकाणी त्याचा व्हिडीओ तयार करून व्हायरल करणे हा कटाचा भाग असू शकतो. संबंधित व्यक्तीसह त्यांना सहकार्य करणार्याविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, वरिष्ठांच्या सूचनेनुसार गुन्हा दाखल करण्यात येईल, असे जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढे यांनी सांगितले. शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील स्वत: रात्री उशिरापर्यंत या घटनेची चौकशी करीत होत्या.