

कोल्हापूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत मिशन लक्षवेध योजनेंतर्गत क्रीडा विकास केंद्रांकरिता दुसर्यांदा निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत कुस्ती, नेमबाजी, वेटलिफ्टिंग या खेळांसाठी निवड चाचणी होणार आहे.
योजनेच्या माध्यमातून ऑलिम्पिक स्तरावर खेळल्या जाणार्या 12 खेळांवर लक्ष केंद्रीत केले असून परफॉमन्स सेंटर, विभागीय स्तरावर स्पोर्टस् एक्सलन्स सेंटर व जिल्हा स्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्र राबविण्यात येणार आहेत. मिशन लक्षवेध योजनेतून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये क्रीडा प्रतिभा विकास केंद्र यामार्फत कुस्ती, मैदानी, वेटलिफ्टिंग, हॉकी व रायफल शूटिंग अशा एकूण 5 क्रीडा प्रकारांमधून प्रत्येकी 20 खेळाडूंची निवड करण्यात येणार आहेत.
कोल्हापूर जिल्हास्तरावर मैदानी, हॉकी या खेळांकरिता निवड चाचणी एप्रिलमध्ये झाली. उर्वरित रायफल शूटिंग, कुस्ती व वेटलिफ्टिंग या खेळांसाठी पुन्हा निवड चाचणी होणार आहे. खेळाडूचे वय 21 वर्षांच्या आत असावे, अर्जासोबत जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, शासन मान्यता प्राप्त डॉक्टराकडून वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, गत 2 वर्षांतील खेळातील कामगिरींची प्रमाणपत्रे, पासपोर्ट साईज 3 फोटो, शाळा-महाविद्यालय बोनाफाईड प्रमाणपत्र, पालकांचे संमतीपत्र आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.
रायफल शूटिंग निवड चाचणी दि. 28 मे छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल येथे, वेटलिफ्टिंग व कुस्ती निवड चाचणी दि. 29 मे रोजी छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे होणार आहे. संबंधित खेळाडूंनी अधिक माहितीसाठी सहायक क्रीडा अधिकारी अजिंक्य चौगले, राज्य क्रीडा मार्गदर्शक अनिकेत बोडके यांच्याशी संपर्क साधावा. तसेच, आवश्यक कागपत्रांची पूर्तता missionlakshvedhdsokop@gmail. com या मेल आयडीवर किंवा प्रत्यक्षात अर्ज दि. 26 मेपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी पत्रकाद्वारे केले आहे.