

चंद्रशेखर माताडे
कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी महायुतीत जागा वाटपाचे सूत्र अद्याप निश्चित झालेले नाही. त्यासाठी नेत्यांची समिती नेमली असली, तरी प्रभाग रचना व आरक्षण निश्चित नसल्याने त्यांची बैठक नाही. कोल्हापुरात मात्र लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महायुतीने मिळविलेल्या घवघवीत यशाच्या आधारावर जागा वाटप करावे, अशी मागणी जोर धरत आहे. विशेषत: शिंदे शिवसेनेला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडून या मागणीचा रेटा लावला जात आहे.
लोकसभेचे एक खासदार विधानसभेत जिल्ह्यात दहापैकी तीन पक्षाचे व एक सहयोगी असे चार आमदार, बहुतेक माजी नगरसेवकांचा होत असलेला शिंदे शिवसेनेतील प्रवेश या पार्श्वभूमीवर शिंदे शिवसेनेकडून या मागणीचा जोर लावला जात आहे.
महापालिका निवडणुकीच्या जागा वाटपासाठी महायुतीने घटक पक्षातील पक्षांच्या प्रत्येकी दोन नेत्यांची एक समिती नेमली आहे. ही समिती यावर विचार करणार आहे; पण दि. 9 ते 13 ऑक्टोबर या काळात राज्य निवडणूक आयोगाने अंतिम केलेली प्रभाग रचना महापालिका आयुक्त प्रसिद्ध करतील व त्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. त्यामध्ये आरक्षणही निश्चित होईल. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो महायुतीअंतर्गत जागा वाटपाचा. अद्याप जागा वाटपाचे सूत्र निश्चित नाही. त्याचाही तणाव आहेच.
जागा वाटपाचे सूत्र तीन पक्षांचे नेते ठरवतील. यामध्ये ज्या त्या पक्षाची त्या त्या मतदारसंघातील, प्रभागातील, गट व गणातील ताकद पाहूनच निर्णय होणार, हे स्पष्ट आहे; मात्र त्या त्या शहरातील जागा वाटप करताना संसद व विधिमंडळातील त्या त्या पक्षांचे संख्याबळ विचारात घेतले जाणार की विसर्जित सभागृहातील सदस्य संख्येचे निकष लावणार, हे महत्त्वाचे आहे.
संसद व विधिमंडळातील संख्याबळ गृहीत धरले, तर शिंदे शिवसेनेचे एक खासदार व एका सहयोगी आमदारासह चार आमदार आहेत. भाजपचे एक राज्यसभा खासदार असून एक सहयोगीसह तीन आमदार आहेत. जनसुराज्य शक्ती पक्षाचे दोन, तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे एकमेव आमदार आहेत.
विसर्जित कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी , जनसुराज्य शक्ती व शिवसेनेची सत्ता होती. कोल्हापूर जिल्हा परिषदेत अध्यक्षपद पहिली अडीच वर्षे भाजपकडे, तर उर्वरित अडीच वर्षे काँग्रेसकडे होते. इचलकरंजी नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर झाल्यानंतर तेथे पहिल्यांदाच निवडणूक होत आहे.
कोल्हापूर महापालिकेत काँग्रेसचे 30, राष्ट्रवादी काँग्रेसचे 14, ताराराणी आघाडीचे 19, भाजपचे 14 व शिवसेनेचे 4 नगरसेवक होते.
कोल्हापूर जिल्ह परिषदेत काँग्रेसचे 14, भाजपचे 14, राष्ट्रवादीचे 11, शिवसेनेचे 11, जनसुराज्य शक्ती पक्षाचे 6 व इतर 11 सदस्य होते. या इतरमध्ये चंदगड विकास आघाडी 2, स्वाभिमानी शेतकरी संघटना 2, ताराराणी आघाडी 3, आवाडे गट 2, शाहू आघाडी 2 व एक अपक्ष.
इचलकरंजीचे नगराध्यक्षपद भाजपकडे होते. नगराध्यक्षांसह भाजपचे सदस्य 16, काँग्रेसचे 16, ताराराणी पक्षाचे 13, राजर्षी शाहू आघाडीचे 11, राष्ट्रवादीचे 8 व शिवसेनेचा एकमेव सदस्य होता.