आशिष शिंदे
कोल्हापूर : सिझनल फ्लूचा (एच3 एन2) विषाणू सातत्याने आपले रूप बदलत असून, त्यातील जनुकीय बदलांमुळे सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, ‘एच3 एन2’च्या नव्या उपप्रकाराचा (के सब-क्लॅड) जागतिकस्तरावर प्रसार वाढला आहे. भारतातही ‘आयसीएमआर’च्या राष्ट्रीय इन्फ्लूएन्झा सर्व्हिलन्सअंतर्गत ‘एच3 एन2’ची लागण झालेल्या रुग्णसंख्येत वाढ नोंदवण्यात आली आहे. या बदलांमुळे आजार प्राणघातक नसला, तरी संसर्गाचा वेग आणि आजाराचा कालावधी वाढल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवले आहे.
असलेल्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. अनेक रुग्णांना या आजारातून बरे होण्यासाठी दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी लागत असून, यामागे ‘एच3 एन2’ हा ‘इन्फ्लूएन्झा ए’ प्रकारातील सिझनल फ्लू विषाणू कारणीभूत असण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, ‘एच3 एन2’ विषाणूमधील जनुकीय बदलांमुळे सर्दी, खोकला व तापाची लक्षणे अधिक दिवस टिकून राहतात. अनेक रुग्णांमध्ये तीव्र थकवा, अंगदुखी आणि ताप उतरण्यास अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागत असून, प्रतिकारकशक्ती कमी असलेल्या रुग्णांमध्ये ही लक्षणे अधिक तीव्र दिसत आहेत.
फ्लू विषाणूमध्ये सतत होणार्या सूक्ष्म बदलांना जेनेटिक ड्रिफ्ट म्हणतात. ‘एच’ व ‘एन’ प्रथिनांमध्ये झालेल्या बदलामुळे शरीराला विषाणू ओळखण्यात अडथळा येतो. बदललेल्या या रचनेमुळे विषाणू श्वसनमार्गात अधिक काळ टिकून राहतो आणि खोकला-शिंकण्याने वेगाने पसरतो.
‘आयसीएमआर’च्या राष्ट्रीय इन्फ्लूएन्झा सव्हिर्र्लन्सनुसार ‘एच3 एन2’ सिझनल फ्लूची आठवड्यागणीक लॅब कन्फर्म्ड आकडेवारीत सुमारे 3,800 ते 3,900 रुग्ण ‘एच3 एन2’ पॉझिटिव्ह आढळले. हा आकडा तपासणीतून समोर आलेल्या रुग्णांचा असून, प्रत्यक्ष रुग्णसंख्या यापेक्षा अधिक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
‘एच3 एन2’ हा विषाणू जगभर दरवर्षी हंगामी स्वरूपात आढळतो. ‘एच’ (हिमॅग्लुटिनिन) आणि ‘एन’ (न्यूरॅमिनिडेस) ही विषाणूच्या पृष्ठभागावरील प्रथिने असून, त्यावरून हा उपप्रकार ओळखला जातो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, यामध्ये सूक्ष्म जनुकीय बदल (जेनेटिक ड्रिफ्ट) आढळले असून, हिमॅग्लुटिनिन प्रथिनामध्ये अमिनो आम्ल पातळीवर बदल झाले आहेत.