

इचलकरंजी : आपल्याकडे तुझे नग्न व्हिडीओ आहेत, अशी भीती घालून अल्पवयीन १४ वर्षीय शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अत्याचाराचा व्हिडीओ तयार करीत मुलीचा पुन्हा शारीरिक व मानसिक छळ करून विनयभंग केल्याचेही समोर आले आहे. पीडितेने फिर्याद दिल्यावर शिवाजीनगर पोलिसांनी सातजणांविरोधात सामूहिक अत्याचार, पोक्सो तसेच विनयभंग आणि इतर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. यात चार अल्पवयीनांचाही समावेश आहे, अशी माहिती उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांनी दिली.
अमन आदम शेख (वय २०), अल्ताफ बशीर नायकवडे (२१), अनिकेत संजय भोरे (२३, तिघे रा. इचलकरंजी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. चार संशयीत अल्पवयीनांची रवानगी बालसुधारगृहात केली आहे.
अटकेतील संशयितांची होणार कसून चौकशी
शाळकरी अल्पवयीन मुलीला धाक दाखवून अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने इचलकरंजीत खळबळ उडाली आहे. दोन महिन्यांत एकामागोमाग एक सात जणांनी पीडितेवर अत्याचार, विनयभंग करून धमकावल्याचे स्पष्ट झाले असून, अटकेतील संशयितांची आता कसून चौकशी सुरू आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
शाळकरी अल्पवयीन मुलीला तुला मोबाईलवरील काहीतरी दाखवायचे आहे, असे सांगून एका संशयिताच्या घरी बोलावले. तिथे अल्पवयीन संशयिताने तिचा नग्न व्हिडीओ असल्याची भीती दाखवली. दुसर्याने तिच्यावर अत्याचार केला तर तिसर्या संशयिताने अत्याचाराचा व्हिडीओ तयार केला. त्यानंतर संबंधित व्हिडीओच्या आधारे पीडितेला धमकावत एका बोळात बोलावून घेण्यात आले. तिथे संशयितांनी तिच्याशी लगट करीत विनयभंग केला. तिथून पीडितेने सुटका करून घेतली. पुन्हा ती शाळेला जात असताना एक संशयिताने तिचा पाठलाग करून विनयभंग केला. त्यानंतर तिला वारंवार मानसिक त्रास देण्यात आला. काही संशयितांनी तिची छेडछाड करीत अत्याचाराच्या व्हिडीओवरून तिला सातत्याने अश्लील वक्तव्य करून त्रास दिला. या प्रकारामुळे पीडित मुलगी व तिचे कुटुंबीय भयभीत झाले. अखेरीस त्रासाला कंटाळून त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रारी दिली. पोलिसांनी याप्रकरणी अटक केलेल्या तिघांना न्यायालयासमोर हजर केले असता, सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांकडून घटना दडपण्याचा प्रयत्न
दोन दिवसांपूर्वी ही तक्रार दाखल झाली. मात्र, या घटनेची वाच्यता होऊ नये तसेच ही माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत मिळू नये यासाठी खबरदारी घेतली. दोन दिवस दडपलेले हे वृत्त शहरात समजताच संतापाची लाट उसळली. पोलिसांच्या भूमिकेवर संशय निर्माण होत आहे. संवेदनशील गुन्ह्यातही माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याने या प्रकरणाच्या पारदर्शक तपासाचे आव्हान निर्माण झाले आहे.