

कोल्हापूर : जिल्हा परिषदेत गाजलेल्या 29 लाखांच्या शालेय पोषण आहार घोटाळ्यातील फरार असलेल्या जिल्हा परिषदेतील तत्कालीन लेखाधिकारी दीपक बाळासाहेब माने (वय 44, रा. नागाळा पार्क) याला बुधवारी शाहूपुरी पोलिसांनी अटक केली.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या शालेय पोषण आहार योजनेंतर्गत स्वयंपाकी व मदतनीस मानधन तत्त्वावर नेमले जातात. त्यांचे एप्रिल 2021 ते मार्च 2024 या कालावधीतील मानधन न मिळाल्याने तक्रारी येऊ लागल्या. त्याची चर्चा सुरू झाल्यानंतर हे प्रकरण दाबून ठेवण्याचा प्रयत्न सुरू असतानाच डाटा ऑपरेटर महिलेच्या पतीने निवडणुकीच्या केंद्रावरून तत्कालीन लेखाधिकारी दीपक माने याचे अपहरण करून त्याला मारहाण केली. यामुळे हे प्रकरण उघडकीस आले. मारहाण झाल्यामुळे डाटा ऑपरेटच्या पतीवर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर डाटा ऑपरेटर तेसस्विनी साठे हिने दीपक माने याच्या विरुद्ध तक्रार दिल्यामुळे विशाखा समितीच्या वतीने चौकशी करण्यात आली. त्यानंतर माने याला निलंबित करण्यात आले.
या प्रकरणाच्या चौकशीमध्ये शालेय पोषण आहार योजनेच्या (खाते क्र - 145901001568) खात्यावरून स्वयंपाकी व मदतनीसांच्या खात्यावर वर्ग न करता संगनमताने पी एफ एम एस प्रणालीद्वारे आरोपींच्या व त्यांच्या नोतवाईकांच्या खात्यावर वर्ग करून 28 लाख 89 हजार 340 रुपयांचा अपहार केल्याचे आढळून आल्याने शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दि. 6 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये यापूर्वी 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तत्कालीन लेखाधिकारी दीपक माने याच्या अटकेची कार्यवाही तपास अधिकारी सपोनि क्रांती पाटील यांनी सुरू केली; परंतु तो सापडत नव्हता.
दरम्यानच्या काळात दीपक माने याने अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला होता. याठिकाणी अर्ज फोटाळल्यानंतर त्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती; परंतु उच्च न्यायालयाने देखील त्याचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळला. तेव्हापासून माने फरार होता. त्याच्या मागावर पोलिस होते. माने घरी असल्याची माहिती मिळताच त्याला बुधवारी अटक करण्यात आली. पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांती पाटील यांनी ही कारवाई केली.