

Childcare summer Holidays
कोल्हापूर : शाळेतला शेवटचा पेपर झाला... शाळेत न्यायला आलेल्या वडिलांना १४ वर्षांचा शिव म्हणाला, मित्रांसोबत खेळून घरी येतो, तुम्ही पुढे जा. शिव मित्रांसोबत खणीवर गेला, तो घरी परतलाच नाही. ९ वर्षांचा किरण कोळी आईला म्हणाला, आई, मी खेळायला जातो. खेळताना लोखंडी पाईपवर चढताना पडला तो थेट डोक्यावर, क्षणात होत्याचं नव्हतं झालं. अथर्व अवघा १० वर्षांचा. वळवाच्या पावसात भिजण्याचा मोह झाला. विजेच्या खांबावरील वायरचा शॉक बसताच जागीच कोसळला... शाळकरी वयातील मुलांना सुट्टी लागली की, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या या घटनांनी काळजाचा ठोका चुकतो. सुट्टीत मुलांना खेळाचा आनंद मिळतोय, पण जीवाचा घात होतोय. उत्साहाच्या भरात खेळणाऱ्या मुलांची सुट्टी पालकांसाठी मात्र कसोटी ठरत आहे.
पालक म्हणून आपण मुलांना मोकळीक देतो, ती आवश्यक आहे. पण, मोकळीक आणि दुर्लक्ष यामधील सीमारेषा पुसट होऊ देऊ नका, कुठे खेळायला जात आहेत ? सोबत कोण आहे? तिथे कोणती धोकादायक ठिकाणं आहेत का? या गोष्टी तपासणं ही पालकांची जबाबदारी आहे. पोहण्याच्या ठिकाणी लाईफगार्ड वापरा. नदी, विहीर, तलाव यांसारख्या नैसर्गिक ठिकाणी मुलांना एकटे पोहायला जाऊ देऊ नका. वर्दळीच्या रस्त्यावर खेळायला न पाठवता घराजवळच सुरक्षित जागी खेळायला प्रोत्साहित करा. वळवाच्या पावसादरम्यान विजेचे खांब, वायरिंग यापासून दूर ठेवा. सायकल किंवा स्कूटर चालवताना हेल्मेट वापरणं बंधनकारक करा. ग्रामीण भागात मुलं जाणार असतील, तर झाडांवर चढण्यापासून रोखा.
उन्हाळी सुट्टी सुरू झाली की, मुले सकाळपासून संध्याकाळपर्यंत घराबाहेर खेळात गुंततात. हीच वेळ त्यांच्या बिनधास्त, उत्साही स्वभावाची झलक असते; पण तेव्हाच अपघातांची शक्यता वाढते. उपडी विहीर, अपूर्ण बांधकामे, रस्ते कामातील खड्डे, जलतरण तलाव, विजेचे खांब, झाडे, तुटलेल्या विजेच्या वायरी हे सगळं त्यांच्या निरागस आयुष्यासाठी धोकादायक ठरू शकतं
आरोग्य व आपत्कालीन विभागानुसार, गेल्या ५ वर्षात उन्हाळी सुट्टीत होणाऱ्या बाल अपघातांची संख्या सतत वाढत आहे. यामध्ये पोहायला शिकताना बुडणे, मित्रांसोबत तलाव, खणीत अतिउत्साही भावनेत वाहून जाणे, रस्त्यावर वाहनांच्या खाली येणे, झाडावरून किंवा इमारतीतून पडणे, विजेचा धक्का लागणे, सायकल चालवताना जीवघेणा अपघात होणे, अशा घटनांचा समावेश आहे.