Savitribai Phule Scholarship | सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीचे वितरण रखडले

Savitribai Phule Scholarship
Savitribai Phule Scholarship | सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीचे वितरण रखडले
Published on
Updated on

कोल्हापूर : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या वतीने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणारी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीची गेल्या वर्षीची रक्कम अद्याप वितरित न झाल्याने हजारो गरजू विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीला मुकावे लागले आहे. शिक्षणासाठी आधार असलेली ही शिष्यवृत्ती न मिळाल्याने विद्यार्थी व पालकांमधून तीव— नाराजी व्यक्त होत आहे.

मागासवर्गीय नागरिक व विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी समाजकल्याण विभागाच्या वतीने विविध योजना राबविल्या जातात. यामध्ये अनुसूचित जाती, जमातीमधील पाचवी ते दहावीतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा समावेश आहे. शिक्षणात सातत्य राखावे, आर्थिक अडचणींमुळे गळती होऊ नये, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे; परंतु या उद्देशालाच हरताळ फासण्याचे काम राजर्षी शाहूंच्या करवीरनगरीतील जिल्हा परिषद प्रशासनाकडून होत असल्याचे पाहावयास मिळते. जिल्हा परिषद समाजकल्याण विभागात पूर्वी 22 लोक काम करत होते; परंतु जवळपास गेल्या वर्षभरापासून या विभागात केवळ दोनच कर्मचारी काम करत आहेत. त्याचा कामकाजावर परिणाम झाला आहे; परंतु आता थेट विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी मुकावे लागल्यामुळे याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे.

जिल्हा परिषदेत कर्मचारी उपलब्ध नाहीत, असे नाही. केवळ वशिल्यांच्या कर्मचार्‍यांच्या गैरसोयीच्या बदल्या टाळण्यासाठी काम नसलेल्या काही विभागांमध्ये त्यांची सोय करण्यात आली आहे; परंतु लाखो विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणार्‍या शिष्यवृत्तीच्या योजना आणि कोट्यवधीचा निधी दलित वस्ती सुधार योजनेसाठी मिळणार्‍या कामाचा प्रचंड ताण असलेल्या समाजकल्याण विभागाकडे प्रशासन मात्र दुर्लक्ष करत आहे. कर्मचारी उपलब्ध करून देण्याबाबत वारंवार मागणी करूनही प्रशासकांकडून कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे या विभागात शुकशुकाट असतो.

नेते लक्ष देणार काय?

शिक्षणाला चालना देणार्‍या आणि सामाजिक समतेचा संदेश देणार्‍या सावित्रीबाई फुले यांच्या नावाने सुरू असलेल्या योजनेला प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांना मुकावे लागत असेल, तर ती गंभीर बाब आहे. फुले, शाहू आंबेडकर यांचे नाव घेणारे जिल्ह्यातील नेते याकडे लक्ष देणार काय, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news