kolhapur Zilla Parishad | सतेज पाटील यांचा मुश्रीफांना ‘लास्ट कॉल’... मैत्री की, नवी राजकीय खेळी?

kolhapur Zilla Parishad | सतेज पाटील यांचा मुश्रीफांना ‘लास्ट कॉल’... मैत्री की, नवी राजकीय खेळी?
Published on
Updated on

राजेंद्रकुमार चौगले

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या चाव्या कुणाकडे राहणार, याचा फैसला होण्यासाठी काही तासांचा अवधी उरला आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि भाजप यांच्यामध्ये अध्यक्षपदावरून रस्सीखेच सुरू असतानाच, काँग्रेसचे नेते आमदार सतेज (बंटी) पाटील यांनी ‘गोकुळ’च्या एका कार्यक्रमामध्ये हसन मुश्रीफ यांना एक प्रकारे ‘लास्ट कॉल’ देत राजकीय खळबळ उडवून दिली आहे. ‘अजूनही बघा... मी तुमच्यासोबत आहे’ असे सूचक विधान करत सतेज पाटील यांनी ‘गुगली’ टाकली.

कोल्हापूर जिल्हा परिषदेत मुश्रीफ यांच्या राष्ट्रवादीने 20 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे, तर भाजप 12 जागांवर आहे. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने 18 जागा मिळवत आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. भाजपचे धनंजय महाडिक यांनी अध्यक्षपदावर दावा ठोकला होता, तर मुश्रीफ यांनी महायुतीमधील मोठा भाऊ या नात्याने स्वतःच्या पक्षाचा अध्यक्ष करण्यासाठी दंड थोपटले. नेमकी हीच संधी पकडून सतेज पाटील यांनी मुश्रीफांना खुली ऑफर दिली. ‘जर त्यांना भाजपसोबत सत्तेत अडचण येत असेल, तर काँग्रेस त्यांना पाठिंबा देण्यास तयार आहे’, यालाच राजकीय वर्तुळात ‘लास्ट कॉल’ म्हटले जात आहे.

झेडपी अध्यक्षपदाचा सस्पेन्स : मुश्रीफांच्या कोर्टात चेंडू?

येत्या काही तासांत हसन मुश्रीफ हे सतेज पाटलांच्या या ‘लास्ट कॉल’वर काय प्रतिक्रिया देतात, यावर कोल्हापूरचे राजकारण अवलंबून आहे. मुश्रीफ यांनी जर हा कॉल स्वीकारला, तर राज्यात महायुतीला मोठा धक्का बसू शकतो. मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये गेल्या आठवड्यात मुंबई येथील झालेल्या महायुतीच्या बैठकीत राष्ट्रवादीला अध्यक्षपद देण्याचे ठरले असल्याने, मुश्रीफ युतीधर्माला प्राधान्य देण्याची शक्यता अधिक आहे. अंतिमतः हा चेंडू मुश्रीफांच्या कोर्टात आहे.

मैत्री की, युतीधर्म?

हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांची ‘गोकुळ’पासूनची जुनी मैत्री सर्वश्रुत आहे. मात्र, सध्या मुश्रीफ हे महायुतीत (अजित पवार गट) असल्याने त्यांना भाजपला डावलणे कठीण जात आहे. मग त्यांच्याकडे काय पर्याय असू शकतो, तर भाजपसोबत जाऊन सत्ता स्थापन करणे (ज्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली आहे). किंवा सतेज पाटलांच्या मदतीने राजकारणातील ‘कोल्हापूर मॉडेल’ पुन्हा जिवंत करणे आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे. याला आधार म्हणजे आम्ही 18 जागांसह किंगमेकरच्या भूमिकेत आहोत. मुश्रीफांनी जर सन्मानाने साद घातली, तर कोल्हापूरच्या हितासाठी आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ, असे सतेज पाटील यांनी म्हटले आहे. (पत्रकार परिषदेतील सुतोवाच). दुसरे म्हणजे ‘गोकुळ’च्या रविवारी झालेल्या वर्धापन दिन कार्यक्रमात सर्वच पक्षांच्या नेत्यांची झालेली राजकीय टोलेबाजी मंगळवारी होत असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर सस्पेन्स निर्माण करणारी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news