

कोल्हापूर : गोकुळ निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीमध्ये सुरू असलेला अंतर्गत वाद संपूर्ण जिल्हा बघत आहे. या अंतर्गत राजकारणाचा फटका दूध संस्थांना बसणार नाही, याची खबरदारी घ्या. संस्था कोणाच्याही असो, त्यांचा मतदानाचा हक्क हिरावून घेऊ नका, तो अबाधित राहिला पाहिजे, अशी मागणी काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी केली. त्यांनी सहायक निबंधक कृष्णा ठाकरे यांची सहायक निबंधक कार्यालयात भेट घेऊन दूध संस्था सुनावणीची माहिती घेतली.
आमदार पाटील म्हणाले, ग्रामीण भागात दूध उत्पादकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे दूध संस्थाही वाढल्या आहेत. अवसायनातील अनेक दूध संस्था गेली अनेक वर्षे गोकुळला दूध पुरवठा करत आहेत. त्यांनी अनेकवेळा मतदानही केले आहे. तरीही या संस्था अवसायनात प्रक्रियेत आल्या आहेत. त्यामुळे या दूध संस्थांची सुनावणी प्रक्रिया तत्काळ पूर्ण करून त्यांचा मतदानाचा हक्क अबाधित राहील यासाठी प्रयत्न करा, असे आमदार पाटील यांनी सांगितले.
यावेळी गोकुळचे माजी संचालक बाबासो चौगले, शशिकांत पाटील-चुयेकर, चेतन नरके, बयाजी शेळके, अभिजित तायशेटे, प्रकाश पाटील, अंजना रेडेकर, जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील, विनायक कारंडे, मोहन सालपे आदी उपस्थित होते.
सुनावणी प्रक्रिया तत्काळ पूर्ण करा
गोकुळची निवडणूक 90 दिवसांत घ्या, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार दूध संस्थांची सुनावणी गतीने होणे गरजेचे आहे. सध्या कायदेशीरदृष्ट्या या संस्था अवसायनात आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यास त्या मतदानास अपात्र ठरतील. त्यामुळे या संस्थांची सुनावणी प्रक्रिया गतीने पूर्ण करा, अशी सूचना आमदार पाटील यांनी सहायक निबंधक यांना केली.