

कोल्हापूर : आमदार शिवाजी पाटील, प्रकाश बेलवाडे यांनी जिल्हा बँकेत लक्ष घालण्यापूर्वी महायुतीने त्यांच्याशी चर्चा करून गैरसमज दूर करावेत. ‘गोकुळ’संदर्भातही गेल्या तीन महिन्यांपासून हेच सांगत होतो. पण दुर्दैवाने महायुतीत ते झालं नाही. महायुती हिमालयासारखी आहे, आम्ही सह्याद्री तरीही हिमालयासारख्या महायुतीला सह्याद्रीची विनंती राहील की, त्यांनी आमदार पाटील यांच्याशी चर्चा करून गोकुळ, जिल्हा बँकेबाबत त्यांचे असणारे गैरसमज दूर करावेत, अशी अपेक्षा आमदार सतेज पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
आ. सतेज पाटील म्हणाले, गोकुळच्या दूध संकलनात आजरा, चंदगड, गडहिंग्लज तालुक्याचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे या तालुक्यांना गोकुळचे नेतृत्व मिळावे अशी आमदार शिवाजी पाटील यांची असलेली भूमिका योग्यच आहे. जिल्हा बँक गोकुळमध्ये येताना पक्षीय पायताण बाहेर ठेवलं पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणे म्हणजेच सहकार आहे. त्यानुसार महायुतीच्या नेत्यांनी आमदार पाटील यांना विश्वासात घेणे आवश्यक आहे.