कोल्हापूर : कोण कोठे गेले, याचा विचार करत बसू नका. जनता माझ्यासोबत आहे आणि मी जनतेसोबत आहे. आगामी महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचाच महापौर करणे हेच माझे उद्दिष्ट असून ते पूर्ण करण्यासाठी पुढचे चार महिने कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करावे, असे आवाहन विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी केले. काँग्रेसच्या स्टेशन रोडवरील सभागृहात झालेल्या आजी-माजी नगरसेवक, महापौर, पदाधिकारी, इच्छुक उमेदवारांच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार शाहू महाराज होते.
सतेज पाटील म्हणाले, राज्यात महायुतीच्या सरकारच्या बेशिस्त कारभारामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. कराचा बोजा लादण्याची शक्यता आहे. त्यामुळे संघर्षाची तयारी करून स्थानिक स्वराज्य संस्थापासून पुन्हा आपली सत्ता आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. शहर विकासाची अनेक कामे केली आहेत. पुढचे कामांचे जाहीरनामे आपण देणार आहोत. 18 ते 25 वयोगटातील तरुणांनाही काँग्रेसचा समाजाला एकसंघ ठेवण्याचा, एकजुटीचा विचार सांगून त्यांना आपल्याकडे वळविले पाहिजे.
गांजा, चरससारख्या नशेच्या आहारी तरुण पिढीला ढकलून उद्ध्वस्त करण्याचे कारस्थान सुरू आहे. उघड्या डोळ्यांनी हे पाहत बसू नका, असे आवाहन करत सतेज पाटील म्हणाले, शहरात राजरोस गांजा, चरस यासह अन्य नशेच्या वस्तू विकल्या जात असतील, पोलिस कारवाई करत नसतील, तर त्याविरोधात आंदोलन करून कारवाई करायला भाग पाडू व नशेपासून तरुण पिढीला वाचवण्यासाठी प्रयत्न करू.
अध्यक्षीय भाषणात खासदार शाहू महाराज म्हणाले, सतेज पाटील यांनी रणशिंग फुंकले आहे. त्यांचे प्लॅनिंगच मायक्रो असते. त्यामुळे विजयाची खात्री आपल्याला वाटते. गेले ते स्वार्थी होते. उरले ते आपले सारथी आहेत असे सांगून ऋतुराज पाटील म्हणाले, सत्ता नसतानाही 2015 च्या महापालिका निवडणुकीत आपण काँग्रेसची सत्ता महापालिकेवर आणली. त्याची पुनरावृत्ती पुन्हा करू. राजू लाटकर यांनी कोल्हापूर गांजामुक्त करण्यासाठी आमदार सतेज पाटील, खासदार शाहू महाराज यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. मेळाव्यासाठी निष्ठावंत कार्यकर्त्यांचा महापूर आल्याचे आमदार जयंत आसगावकर यांनी सांगितले. यावेळी भूपाल शेटे, दुर्वास कदम, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, अमर समर्थ यांची भाषणे झाली.
मेळाव्यास आनंद माने, सूर्यकांत पाटील-बुद्धिहाळकर, माजी महापौर भीमराव पवार, महादेवराव आडगुळे, अश्विनी रामाणे, स्वाती यवलुजे, वैशाली डकरे, सूरमंजिरी लाटकर, शोभा बोंद्रे, वंदना बुचडे यांच्यासह 87 माजी नगरसेवक उपस्थित होते.
सतेज पाटील म्हणाले, कोण आले, कोण गेले, याचा विचार मी कधी केला नाही. कारण, सतेज पाटील हे कार्यकर्ता बनविणारी फॅक्टरी आहे. अजूनही कोणाला दुसरीकडे कोठे जायचे असेल तर जावा; परंतु आमच्या बैठकीला बसायचे, चर्चा ऐकायच्या आणि ऐनवेळी निवडणुकीच्या तोडांवर उड्या मारून आम्हाला फसविण्याचा प्रयत्न करू नका. तसे कोणी केल्यास त्याला सोडणार नाही. माझा मुक्काम त्याच्याच वॉर्डात असेल. त्यांचा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय मी गप्प राहणार नाही.
राजकीय दबावापोटी प्रभाग रचनेत गोंधळ घातला, तर महापालिकेला घेराव घालू, असे सांगून आ. सतेज पाटील म्हणाले, प्रभाग रचनेचे काम हे नियमाप्रमाणेच झाले पाहिजे. निवडणुकीत लोकांचा कौल आम्हाला मान्य असेल; पण कोणाला तरी फेव्हर करण्याच्या दुष्टीने प्रभागांची फोडाफोडी झाली तर खपवून घेणार नाही.