

कोल्हापूर : गणेश विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशांचा गजर आणि रंगीबेरंगी रोषणाईच्या धामधुमीत शनिवारी रात्री राजकीय सुंस्कृतीचे दर्शन घडले. पक्ष पक्षाच्या ठिकाणी आणि नातं नात्याच्या ठिकाणी, असे म्हणत विसर्जन मिरवणुकीत पक्ष बाजूला ठेवून नेत्यांच्या झालेल्या गाठीभेटी चर्चेचा विषय ठरला. महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना शिंदे, राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यासह बहुतांशी स्वागत मंडपांना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी भेटी दिल्या.
गणेश विसर्जन मिरवणुकीत नेहमी प्रमाणे आमदार सतेज पाटील महापालिकेच्या स्वागत मंडपात बसले होते. शहाजी तरुण मंडळाची मिरवणूक महापालिका स्वागत मंडपासमोर आल्यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सतेज पाटील यांना मिरवणुकीत सहभागी होण्याचा आग्रह धरला. पाटीलही गर्दीत सामील झाले आणि ठेका धरत उत्साहाचा माहोल रंगवला.
पाटील काही अंतर जाताच शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी उभारलेल्या स्वागत मंडपासमोर आले. मंडपाच्या पायर्या चढत ते व्यासपीठावर आले आणि मिरवणुकीतील मोबाईचे फ्लॅश एका पाठोपाठ क्लिक झाले. त्यांच्या या भेटीचा व्हिडीओ क्षणार्धात व्हायरल झाला आणि संपूर्ण मिरवणुकीत तो चर्चेचा विषय ठरला. फेटा बांधूच पण, तुम्ही अगोदर तब्येतीची काळजी घ्या असा सल्ला राजेश क्षीरसागर यांना देत पाटील यांनी व्यासपीठ सोडले.
येथून त्यांनी माजी आमदार मालोजीराजे यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या स्वागत मंडपात हजेरी लावली. त्यांचे स्वागत भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, विराज चिखलीकर, धनश्री तोडकर यांनी केले. यावेळी सतेज पाटील यांनी, तुम्ही सर्व मूळचे भाजपचे आहात त्यामुळे तुमच्याकडे यायला मला काही वाटणार नाही, असे केलेल्या वक्तव्याने वातावरण हलकेफुलके झाले. यामुळे मिरवणूक संपल्यानंतर सतेज पाटील भाजपच्या मंडपात, अशी चर्चा सुरू होती.