

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, ‘गोकुळ’ निवडणुकीत एकाकी लढा देणार्या आ. सतेज पाटील यांनी जोरदार मुसंडी मारत सत्ता काबीज केली. तर, विजयाचा दावेदार समजल्या जाणार्या महायुतीच्या छ. शाहू शेतकरी विकास आघाडीचा धक्कादायक पराभव झाला. चार हजार ठराव असणार्या महायुतीला क्रॉस व्होटिंगचा फटका बसला. निवडणुकीत अनेक दिग्गजांना फटका बसला, तर १३ नव्या चेहर्यांना संचालकपदाची संधी मिळाली.
‘गोकुळ’ निवडणुकीत तीन मंत्री, दोन खासदार आणि दहा आमदार यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे तगडे पॅनेल विजयाचे प्रबळ दावेदार समजले जात होते. जिल्ह्यातील महायुती नेत्यांनी त्यांच्याकडे चार हजार ठराव असल्याचे वारंवार सांगितले. तसेच, निवडणूक एकतर्फी असून निकाल २५-० च असणार, असा ठाम विश्वासही व्यक्त केला. मात्र, महायुतीच्या नेत्यांचा हा विश्वास आ. सतेज पाटील यांनी फोल ठरवत ‘गोकुळ’वर दमदार विजय मिळविला. महायुतीत राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्यानंतर ‘गोकुळ’चे माजी संचालक किसन चौगले यांनी बंडखोरी केली. त्यांनी आ. सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीमध्ये प्रवेश करत निवडणूक लढविली. चौगले यांनी सर्वसाधारण गटात आठ नंबरची मते मिळवत विजय मिळविला.
क्रॉस व्होटिंगने वाढवली महायुतीची चिंता
मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होताच मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग झाल्याचे चित्र स्पष्ट झाले. दुपारपर्यंत महायुतीचे अनेक दिग्गज मागे पडल्याने महायुतीची चिंता वाढली. अनेक उमेदवारांच्या तोंडावर समविचारीचे वाढते मतदान पाहून चिंता वाढली होती. मतमोजणीस्थळी फेर्या मारत ते मतदानाच्या आकडेवारीचा आढावा घेत होते.
दुपारच्या सुमारास समविचारीची मते वाढतच निघल्याने महायुतीच्या उमेदवारांनी मतमोजणी हॉलच्या बाहेर एकत्र बसत मतदानाचा आढावा घेतला. कोणत्या तालुक्यात आपण मागे पडत आहाेत याची माहिती घेतली. मात्र, काही वेळाने पराभवाच्या छायेत गेल्यानंतर अनेक उमेदवारांनी मतमोजणीचे ठिकाण सोडले.
शाहूवाडी तालुक्याची समविचारी आघाडीला चांगली साथ मिळाली. तालुक्यामध्ये पॅनेल टू पॅनेल मतदान झाले. समविचारीच्या बहुतांश उमेदवारांना ९० हून अधिक, तर महायुतीच्या उमेदवारांना साधरणत: ५० च्या आसपास मते मिळाली.
मतमोजणी ठिकाणी दोन्ही आघाड्यांचे समर्थक उपस्थित होते. मात्र, पोलिसांनी त्यांना मतमोजणी केंद्रापासून काही अंतरावरच रोखले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घटनास्थळी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.
‘गोकुळ’ निवडणुकीत मतदान करताना मतपत्रिकेसोबत एखादी चिठ्ठी टाकत मतदार त्यांच्या भावना व्यक्त करतात. या निवडणुकीत मतपेटीत चिठ्ठी न टाकण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकार्यांनी केले होते. तरीही एक चिठ्ठी मतपेटीतून आलीच. या चिठ्ठीत संबंधित ठरावधारकाने, ‘तुमच्या पोरांसाठी आम्ही शपथा घ्यायच्या का?’ अशा सवाल महायुतीच्या नेत्यांना केला.
गत निवडणुकीत आ. सतेज पाटील यांचे सात शिलेदार विजयी होऊनही त्यांच्या वाट्याला चेअरमनपद आले नाही. मात्र, यावेळी १३ जागा निवडून आणून त्यांनी वचपा काढला. शशिकांत पाटील यांच्या चेअरमनपदाची घोषणा निवडणूक प्रचार शुभारंभातच त्यांनी केली होती.
सलग तीन निवडणुकांत मावळते चेअरमन पराभूत
२०१५ च्या निवडणुकीत दिलीपराव पाटील, २०२१ च्या निवडणुकीत रवींद्र आपटे आणि २०२६ च्या निवडणुकीत नवीद मुश्रीफ हे मावळते चेअरमन पराभूत झाल्याने मावळते चेअरमन पराभूत होण्याची परंपरा कायम राहिली.
बाराही तालुक्यांना प्रतिनिधित्व
गत निवडणुकीत गडहिंग्लज, चंदगड आणि शिरोळ तालुक्यांना संचालक मंडळात प्रतिनिधित्व मिळाले नव्हते. या निवडणुकीत मात्र जिल्ह्यातील बाराही तालुक्यांना ‘गोकुळ’मध्ये प्रतिनिधित्व मिळाले आहे.
५ तालुक्यांत ‘सत्ताधारी’चा संचालक नाही
सत्तेवर आलेल्या आ. पाटील आघाडीचे सात तालुक्यांतून १३ संचालक निवडून आले, तर पाच तालुक्यांत सत्ताधारी गटाचा एकही संचालक नाही.
एक माजी सुपरवायझर विजयी, तर दुसरा पराभूत
‘गोकुळ’चे भुदरगड तालुक्यातील माजी सुपरवायझर मदन देसाई हे विरोधी गटातून संचालक बनले, तर आ. पाटील यांच्या आघाडीतून हातकणंगलेतील निवृत्त सुपरवायझर विश्वास इंगवले हे पराभूत झाले.