

कोल्हापूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांत नगरपालिकानिहाय विचित्र आघाड्या अस्तित्वात येऊ लागल्या आहेत. काही ठिकाणी एकमेकांचे राजकीय शत्रू एकत्र येत आहेत, तर काही ठिकाणी मित्र एकमेकांना आव्हान देत आहेत. कागलमध्ये झालेली हसन मुश्रीफ व समरजित घाटगे यांची युती, चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेल्या आघाडीपाठोपाठ जयसिंगपूर नगरपालिकेत राजू शेट्टी यांच्यासह टोकाचा संघर्ष असणारे सतेज पाटील व महाडिक गट एकत्र आल्याने जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.
चंदगड नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ व राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या डॉ. नंदाताई बाभुळकर यांनी एकत्र येत पहिला धक्का दिला. त्याची चर्चा थांबते न थांबते तोच कागलमध्ये गेल्या अकरा वर्षांपासूनचे एकमेकांचे राजकीय विरोधक असणारे मुश्रीफ व समरजित घाटगे कागल नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने अनपेक्षितपणे एकत्र आल्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच गुरुवारी जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत जिल्ह्याच्या राजकारणात हादरा देणारी घटना घडली.
जयसिंगपूर नगरपालिकेत आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याशी आघाडी करण्याबाबत भाजपची चर्चा सुरू होती. परंतु, ही चर्चा फिस्कटल्यानंतर या ठिकाणी नव्या आघाडीसाठी चक्रे फिरू लागली आणि राजू शेट्टी यांच्यासह टोकाचा संघर्ष असणारे सतेज पाटील व महाडिक गट एकत्र आल्याने जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.
जिल्ह्याच्या राजकारणात सतेज पाटील आणि माजी आ. महादेवराव महाडिक व खा. धनंजय महाडिक यांच्यात विळ्या-भोपळ्याचे सख्य आहे. प्रत्येक निवडणुकीत पाटील विरुद्ध महाडिक असा सामना रंगत असतो. दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांतही टोकाचा संघर्ष आहे. या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीत सतेज पाटील व महाडिक गट एकत्र आल्याने खळबळ माजली आहे.