

कोल्हापूर : माझे विरोधी पक्षनेते पद हुकले याची मंत्री हसन मुश्रीफ यांना काळजी असेल, तर त्यांनाच मुख्यमंत्र्यांकडे माझ्यासाठी शब्द टाकायला सांगा, असे म्हणत आमच्या दोस्तीच्या तुटलेल्या दोरीची कधीही गाठ मारता येते, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केले.
आमच्या दोस्तीची दोरी तुटली आहे, असे उद्गार राष्ट्रवादीचे नेते मंत्री मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना काढले होते. त्या पार्श्वभूमीवर आ. पाटील यांना पत्रकारांनी विचारले होते. याचवेळी आ. पाटील यांनी मंत्री मुश्रीफ व माझ्या दोस्तीतील दोरी तुटली आहे, हे खरे असल्याचेही स्पष्ट केले.
...तर, पॅनेलवर परिणाम!
महापालिका निवडणुकीविषयी महाविकास आघाडीअंतर्गत कोल्हापुरात ज्या पक्षाची जेथे ताकद, तेथे त्या पक्षाचा उमेदवार, असे सूत्र अवलंबण्यात येणार आहे. एखादा कमजोर उमेदवार असेल, तर त्याचा पूर्ण पॅनेलवर परिणाम होणार आहे. काँग्रेसच्या वतीने ठाकरे सेना, राष्ट्रवादी शरद पवार गट, आम आदमी पक्ष आदी पक्षांबरोबर जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. कोणत्याही पक्षातील सक्षम उमेदवारांवर अन्याय होणार नाही.
खड्डेमुक्त कोल्हापूर...
कोल्हापूरच्या जनतेचा विश्वास काँग्रेसवर आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि महाविकास आघाडीला चांगले यश मिळेल. कोल्हापूर खड्डेमुक्त करण्याबरोबरच सर्वांगिण विकास हेच आमचे प्राधान्य राहील.
हम करे सो कायदा...
महापालिका निवडणुकीत अद्याप महापौरपदाचे आरक्षण झाले नसल्याचे सांगून भाजप, महायुतीचे सरकार म्हणजे हम करे सो कायदा... अशा पद्धतीने वागत आहे. महायुती सरकारच्या काळात लोकशाहीला पोषक वातावरण नाही, अशी टीकाही आ. पाटील यांनी केली.