Gokul News| आम्‍ही सकारात्‍मक, आमच्‍या नेत्‍यांशी बोला...

‘गोकुळ’ अध्‍यक्ष निवडीबाबत महायुतीच्‍या संचालकांनी केला संपर्क; आ. सतेज पाटील यांची माहिती
Kolhapur Gokul Dudh Sangh
Kolhapur Gokul Dudh Sangh Pudhari
Published on: 
Updated on: 

कोल्‍हापूर : ‘गोकुळ’ अध्‍यक्ष निवडीबाबत आम्‍ही सकारात्‍मक आहेात, तुम्‍ही आमच्‍या नेत्‍यांशी बोला, असा संपर्क महायुतीच्‍या संचालकांनी केला आहे. त्‍यानुसार महायुतीचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, आ. विनय कोरे, आ. चंद्रदीप नरके यांच्‍याशी फोनवरून संपर्क केला आहे. अध्‍यक्ष निवड बैठकीत कोरम पूर्ण करण्‍याबाबत विनंती केली असल्‍याचे सांगत आ. सतेज पाटील यांनी महायुती नेत्‍यांनी बहुमताचा आदर राखत सहकार्याची भूमिका घ्‍यावी, असे आवाहन प्रसारमाध्‍यमांशी बोलताना केले.

आ. पाटील यांनी, ‘गोकुळ’ निवडणुकीत मतदारांनी समविचारी आघाडीला बहुमत दिले आहे. २५ पैकी १३ जागा जिंकत समविचारी आघाडीने स्‍पष्‍ट बहुमत मिळविले आहे. मात्र, अध्‍यक्ष निवड बैठकीच्‍या तोंडावर बैठकीतील कोरम संख्‍येचा तांत्रिक मुद्दा समोर आला आहे. महायुतीने कोरमचा मुद्दा न करता मतदारांनी दिलेल्‍या बहुमताचा आदर राखावा व अध्‍यक्ष निवडीसाठी सहकार्य करावे, अशी भूमिका मांडली.

‘गोकुळ’ला संचालक मंडळाची आवश्‍यकता

‘गोकुळ’ला मागील महिन्‍यात २४ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. एकटे प्रशासक संघ चालवू शकत नाहीत. काही धोरणात्‍मक निर्णय घेताना त्‍यांना मर्यादा येत आहेत. त्‍यामुळे ‘गोकुळ’मध्‍ये संचालक मंडळ अस्‍तित्‍वात येणे आवश्‍यक असल्‍याचे आ. पाटील यांनी सांगितले.

मुख्‍यमंत्री हस्‍तक्षेप करणार नाहीत

‘गोकुळ’मध्ये तज्ज्ञ संचालकांची संख्या वाढवून महायुतीतील घटकपक्षांना प्रत्येकी एक जागा देण्याचा प्रयत्‍न होण्याची शक्यता असावी. मात्र, तज्ज्ञ संचालकांना मतदानाचा अधिकार दिल्यास लोकशाही प्रक्रियेवर प्रश्‍नचिन्‍ह निर्माण होईल. असा नियम कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही. त्‍यामुळे मुख्‍यमंत्री अध्‍यक्ष निवडीत हस्‍तक्षेप करणार नाहीत, असा विश्‍वास आ. पाटील यांनी व्‍यक्‍त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news