जाणार्‍यांना जाऊद्या, येणार्‍यांसोबत निवडणूक जिंकू : आमदार सतेज पाटील

काँग्रेसच्या माजी नगरसेवकांच्या बैठकीत सतेज पाटील यांचे आवाहन; 34 जणांची उपस्थिती
satej-patil-appeals-in-meeting-of-former-congress-corporators
आमदार सतेज पाटीलFile Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे दुःख सर्वांनाच आहे. मात्र खचून न जाता आणि आपल्याला सोडून जाणार्‍यांचा विचार न करता, जे येतील त्यांना सोबत घेऊन कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुका पुन्हा जिंकण्यासाठी प्रयत्न करूया, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले. मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये काँग्रेसच्या माजी नगरसेवकांच्या बैठकीत त्यांनी हे आवाहन केले.

या बैठकीला 34 माजी नगरसेवक उपस्थित होते. माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख आणि माजी महापौर निलोफर आजरेकर वगळता इतर सर्व माजी नगरसेवकांनी उपस्थिती लावली.

बैठकीत शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चव्हाण, माजी उपमहापौर संजय मोहिते, राहुल माने, भूपाल शेटे, प्रवीण केसरकर, तौफिक मुल्लाणी, मधुकर रामाणे, सागर यवलुजे, श्रावण फडतारे, सुभाष बुचडे, शोभा कवाळे, ईश्वर परमार, राजाराम गायकवाड यांसारखे प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले.

काँग्रेसचे 12 नगरसेवक पक्ष सोडून इतर पक्षांत जाण्याच्या तयारीत असल्याच्या पार्श्वभूमीवर काही माजी पदाधिकार्‍यांनी पुढाकार घेत ही बैठक आयोजित केली होती. पंधरा दिवसांत दुसर्‍यांदा प्रीतिभोजनासह अशा प्रकारची बैठक झाली. बैठकीत विधानसभा निवडणुकीतील अनपेक्षित निकाल आणि त्याचे राजकारण यावरही चर्चा झाली. सतेज पाटील म्हणाले, विधानसभा निवडणुकीत माझ्यावर राज्यभराची जबाबदारी होती. मी तुम्हाला भेटायला येण्याऐवजी तुम्ही मला भेटायला यावे, मी कधी कोणाला अडवले आहे का, असा प्रतिप्रश्नही त्यांनी माजी नगरसेवकांना केला. पुढील बैठकीस माजी आमदार मालोजीराजे आणि ऋतुराज पाटील हे दोघेही सक्रिय होतील आणि आपण काँग्रेससह महाविकास आघाडी म्हणून पुन्हा ताकदीने लढू, असे आश्वासन त्यांनी दिले. जाणार्‍यांचा विचार न करता जे आपल्या सोबत राहतील, त्यांना घेऊन सामान्य कार्यकर्त्यांची फळी पुन्हा उभी करूया आणि आगामी महापालिका निवडणुकीला सामोरे जाऊ, असे सतेज पाटील यांनी ठामपणे सांगितले.

ऋतुराज पाटील, मालोजीराजेही होणार सक्रिय

जिल्ह्यात आगामी होणार्‍या सर्वच निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकसंधपणे लढल्या जातील. माजी नगरसेवकांच्या पुढच्या बैठकीला माजी आमदार ऋतुराज पाटील आणि माजी आमदार मालोजीराजे यांना सक्रिय करून घेऊया. पुन्हा महापालिकेच्या निवडणुका ताकदीने लढविण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

आमच्यातीलच एकावर जबाबदारी द्या

महापालिका निवडणुकीसह अन्य कोणताही कृतिशील कार्यक्रम करताना त्यासाठी आमच्यातीलच कोणा तरी एकाकडे जबाबदारी द्या, उपरे कार्यकर्ते किंवा नेते आणल्यामुळेच मतभेद होतात. हे टाळण्यासाठी आमच्यापैकीच एकाची प्रमुख म्हणून नियुक्ती करा, अशी मागणीही माजी नगरसेवकांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news