Gokul Election| गोकुळ संपवणे हाच मुंबईतून निर्णय घेणाऱ्या महायुतीचा अजेंडा

आ. सतेज पाटील यांचा घणाघात : चुये येथे रा. शाहू शेतकरी समविचारी आघाडीचा प्रचार शुभारंभ मेळावा
Gokul Election
चुये : येथील समविचारी आघाडीच्‍या प्रचार शुभारंभ मेळाव्‍यात बोलताना आ. सतेज पाटील. सोबत व्‍यासपीठावर उपस्‍थित माजी खा. राजू शेट्टी, माजी आ. बजरंग देसाई, सत्‍यजित पाटील-सरुडकर, ऋतुराज पाटील, राजू आवळे, राजीव आवळे आदी.
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : महायुतीतील तिन्ही घटक पक्ष सहा महिने एकमेकांशी भांडत राहिले. त्यांनी प्राथमिक दूध संस्थांना अक्षरशः वेठीस धरले. नुरा कुस्ती खेळून फक्त खडाखडी केली आणि आता निवडणुका जाहीर झाल्यावर एकमेकांच्या गळ्यात गळे घालत आहेत. सर्व निर्णय मुंबईत घेणाऱ्या महायुतीचा अजेंडा गोकुळ संपवणे हाच असल्याचा घणाघात आमदार सतेज पाटील यांनी केला. गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी चुये येथे आयोजित ‘राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी’च्या प्रचार शुभारंभाप्रसंगी आयोजित मेळाव्‍यात ते बोलत होते.

गोकुळचे संस्थापक स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून प्रचार शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, शिवसेना सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, माजी आमदार बजरंग देसाई, सत्यजित पाटील- सरुडकर, राजीव आवळे, ऋतुराज पाटील, राजू आवळे, गोकुळचे माजी अध्यक्ष रणजित पाटील व सर्व उमेदवार उपस्थित होते.

आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘‘सत्तेसाठी एकत्र आलेल्या मंडळींचा गेल्या सहा महिन्यांपासून चालेला तमाशा जिल्ह्याने पाहिला आहे. आमची लढाई साडेपाच लाख दूध उत्पादकांच्या संसारासाठी आणि गोकुळ टिकवण्यासाठी आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे अर्थकारण जिवंत ठेवायचे असेल, तर गोकुळ टिकवणे गरजेचे आहे. गोकुळ शेतकऱ्यांच्या मालकीचा राहावा यासाठी समविचारीच्‍या सर्व उमेदवारांना विजयी करा आणि विकासाची शिट्टी वाजवा.’’

माजी खा. राजू शेट्टी म्हणाले, ‘‘महानंद दूध संघ बंद पाडल्यानंतर आता मुंबईतील गोकुळचे मार्केट अमूलच्या घशात घालण्याचा डाव महायुती नेत्‍यांचा आहे.’’ विजय देवणे यांनी सतेज पाटील यांच्यासारख्या खमक्या नेतृत्वाची गोकुळला गरज असल्‍याचे सांगितले. माजी आ. ऋतुराज पाटील यांनी गोकुळच्या चाव्या कोल्हापुरातच ठेवायच्या का मुंबई, दिल्लीतील नेत्‍यांच्‍या हातात द्यायच्‍या याचा निर्णय स्वभिमानी शेतकऱ्यांनी घ्यायचा असल्‍याचे सांगितले. माजी आ. सत्यजित पाटील यांनी महायुतीने विविध मार्गांनी गोकुळ मोडीत काढण्याचा प्रयत्‍न केला. गोकुळ वाचवण्याची ही शेवटची संधी असून, समविचारीच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन केले. माजी आ. राजू आवळे यांनी ही लढाई मतदानाचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी आहे, असे सांगितले.

खासदारांचे कुरघोडीचे राजकारण

राज्यसभा खासदार हे शशिकांत पाटील यांना चेअरमन का केले नाही, असे विचारतात. प्रत्यक्षात शेवटच्या चेअरमन निवडीअगोदर या लोकांनीच मुंबईत कुरघोड्या करून त्यांना चेअरमन पदापासून रोखले. हे खासदार बोलतात एक आणि करतात दुसरेच, अशी टीका सुयोग वाडकर यांनी केली.

त्‍यांची इच्‍छा पूर्ण करुया

स्व. आनंदराव पाटील-चुयेकर यांनी त्या काळी माझ्या आजीचे सोने गहाण ठेवून गोकुळसाठी पैसे उभे केले. त्यांच्या शेवटच्या दिवसात भेटायला येणाऱ्यांनाही ते गोकुळ शेतकऱ्यांच्या मालकीचा ठेवा, असे सांगत होते. त्यांची ही इच्छा पूर्ण करायची असल्‍यास गोकुळवर समविचारी आघाडीची सत्ता येणे आवश्यक आहे, असे माजी संचालक शशिकांत पाटील-चुयेकर यांनी सांगितले.

गोकुळचे अस्‍तित्‍व संपविण्‍याचा प्रयत्‍न

गुजरातमधील अमूल डेअरी परिसरात सरदार वल्लभभाई पटेल सहकारी डेअरी फेडरेशन ही मल्टिस्टेट संघटना स्थापन केली आहे. गोकुळला या फेडरेशनशी जोडून गोकुळचे अस्तित्व संपविण्याचा महायुतीचा डाव आहे. त्यासाठीच आतापासूनच गोकुळशी संबंधित सर्व निर्णय हे मुंबईतून घेतले जात आहेत, असा आरोप आ. सतेज पाटील यांनी केला.

तुमचा हात मोठा म्‍हणूनच ईडी मागे

बावड्याचा हात निष्ठेचा आहे. त्यामुळे तुम्हाला तो हाती घ्यायला जमला नसावा. तुमचा हात मोठा म्हणूनच ईडी, सीबीआयवाले मागे लावले. विचारधारेमुळे नाही, तर ईडीमुळे ते एकत्र आले आहेत, अशी टीका माजी. आ. राजीव आवळे यांनी मंत्री मुश्रीफ यांचे नाव न घेता केली. तसेच गोकुळ निवडणुकीत कोणी भावासाठी, पत्‍नीसाठी, मुलासाठी लढत आहेत. मात्र, आ. सतेज पाटील शेतकऱ्यांच्या हितासाठी लढत आहेत. त्‍यांना साथ द्या, असे आवाहन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news