

कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचे वारे कोल्हापुरात जोरदार वाहू लागले असून 15 जानेवारी रोजी होणार्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांकडून प्रचारासाठी नवनवीन कल्पनांची रेलचेल सुरू आहे. यंदा संक्रांतीचा सण प्रचारासाठी लक्षवेधी ठरत असल्याचे चित्र दिसत आहे.
संक्रांत म्हटली की वाण, हळदी-कुंकू आणि महिलांचा उत्साह आणि याच भावनेला हात घालत अनेक महिला उमेदवार तसेच उमेदवारांच्या प्रचार यंत्रणा वाणाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे शहरातील बाजारपेठेत वाणासाठी वापरल्या जाणार्या वस्तूंना अक्षरशः मागणी वाढली आहे.
स्टीलच्या वाट्या, प्लास्टिक डबे, हळद-कुंकू सेट, कंगण, सौभाग्यवस्तू, साड्यांचे कव्हर, पिशव्या, तसेच छोट्या उपयोगी गृहसाहित्याला मागणी वाढली असून व्यापार्यांच्या चेहर्यावरही समाधान दिसत आहे. निवडणूक आणि संक्रांत एकत्र आल्याने यंदा विक्री चांगली आहे, असे व्यापारी सांगत आहेत. विशेष म्हणजे, अनेक उमेदवारांनी वाणासोबत प्रचार साहित्याचीही ‘गोड पॅकिंग’ केली आहे. कुठे उमेदवाराचे नाव असलेली चिठ्ठी, कुठे निवडणूक चिन्हाची आठवण करून देणारा स्टिकर, तर कुठे ‘आपली माणसं’ हा भावनिक संदेश दिला जात आहे. अशा कल्पक संकल्पनांनी संक्रांतीचे वाण प्रचाराचे प्रभावी साधन ठरत आहे. राजकीय प्रचारात आता भाषणांपेक्षा भावनिक नाते जपण्यावर भर दिला जात असून, संक्रांतीच्या निमित्ताने प्रचाराला आलेली गोडी नक्कीच शहरात रंग भरत आहे. प्रचार फेर्यांदरम्यान महिला उमेदवार घराघरांत भेट देत असताना त्यांना हळदी-कुंकू लावूनच निरोप दिला जात आहे.
प्रचार भेटीमध्ये हळदी-कुंकवाचे अनौपचारिक कार्यक्रम होत आहेत. संक्रांतीच्या वाणातून मतदारांपर्यंत पोहोचण्याची ही धडपड मतदानाच्या दिवशी किती फलदायी ठरणार, हे मात्र 15 जानेवारीलाच स्पष्ट होणार आहे.
महिला उमेदवारांच्या प्रचार फेर्यांत हळदी-कुंकू कार्यक्रम
महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात यंदा महिला उमेदवार आणि महिला मतदारांमधील संवादाला संक्रांतीची पारंपरिक ओळख लाभताना दिसत आहे. संक्रांत अजून काही दिवस दूर असली, तरी अनेक प्रभागांत महिला उमेदवार आणि महिलांमध्ये हळदी-कुंकवाचे कार्यक्रम आधीच सुरू झाल्याचे चित्र आहे.