

कोल्हापूर ः शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मंगळवारी संजय पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केली. पवार यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिल्याने त्याविषयी दोघांत चर्चा झाली.
कोल्हापूर संपर्कप्रमुख आ. सुनील प्रभू यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. ठाकरे यांनी बुधवारी (दि. 2) दुपारी 1 च्या सुमारास पवार यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्यांना चर्चेसाठी मुंबईत बोलविले आहे. परिणामी शिवसेनेतील बंड शमणार की जिल्हाप्रमुख बदलणार, अशी चर्चा शिवसैनिकांत सुरू झाली आहे. नूतन जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांच्या निवडीवरून शिवसेना ठाकरे गटात प्रचंड वादंग निर्माण झाले आहे. आपल्याला विचारात आणि विश्वासात न घेता ही निवड केल्याचे सांगून पवार यांनी थेट उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. इतर पक्षांतून ऑफर असल्या तरी ठाकरे यांच्याशीच एकनिष्ठ राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पक्षाचे नूतन कोल्हापूर दक्षिण शहरप्रमुख हर्षल सुर्वे यांनी जिल्हाप्रमुख इंगवले यांच्यासोबत काम करणार नसल्याचे सांगून पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. त्यानंतर सुर्वे यांनी शिंदे यांच्या शिवसेनेते प्रवेश केला आहे.
जिल्हाप्रमुखपदी इंगवले यांची निवड झाल्यानंतर अनेक पदाधिकार्यांनी पवार यांच्यासोबतच राजीनामास्त्र बाहेर काढले आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी ठाकरे यांच्याबरोबरच चर्चेत पवार कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.