

कोल्हापूर : समरजित घाटगे यांच्या जमिनीवरील आरक्षणे त्यांना काढायची आहेत, तर हसन मुश्रीफ यांना ईडीच्या कारवाईतून सुटका हवी आहे. त्यामुळे आरक्षण हटविणे व कारवाईतून सुटका या मुद्द्यांवर त्यांची युती झाली आहे. विकासाच्या मुद्द्याचा यामध्ये काहीच संबंध नसल्याची कागलमधून माहिती मिळाल्याची घणाघाती टीका माजी खासदार संजय मंडलिक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.
कागलमध्ये हसन मुश्रीफ व समरजित घाटगे हे एकमेकांचे कट्टर विरोधक एकत्र आल्याने जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी संजय मंडलिक यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी हा आरोप केला.
समरजित घाटगे यांच्या मूळ मालकीच्या काही जमिनींवर आरक्षणे आहेत. ती त्यांना काढून घ्यायची आहेत. काही वर्षांपूर्वी कागलात झालेल्या ईडी कारवाईत भूमिका घेतल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला होता असे सांगून मंडलिक म्हणाले की, असे असताना ते व हसन मुश्रीफ एकत्र येत आहेत. कारण त्याना जमिनीवरची आरक्षणे उठवायची आहेत, तर मुश्रीफ यांना ईडीच्या कारवाईतून सुटका हवी आहे. त्यामुळे आरक्षणे उठविणे व ईडीतून सुटका या दोनच मुद्द्यांवर ही युती झाली आहे. कागलच्या विकासासाठी युती झाली, राजकीय तडजोड झाली किंवा राजकीय समझोता झाला हे खरे नाही, असेही ते म्हणाले. ही प्रॉपर्टी व ईडीच्या डीलमधून ही युती झाल्याचेही मंडलिक म्हणाले.
कट्टर राजकीय शत्रू एकत्र आल्यामुळे आपण आपल्या नगराध्यक्षाच्या उमेदवारांसह 22 जणांना आपल्या एका मित्राच्या घरी सुरक्षित ठेवले आहे. कारण जे विरोधक आता एकत्र आले आहेत त्यांच्याकडे सत्ता तर आहेच, पण मनी व मसल पॉवरही आहे. आमच्या एका उमेदवाराला त्यांनी माघार घ्यायला लावली आहे. ती तरुण मुलगी आहे. तिची भेट झाल्यानंतर काय आमिष दाखविले हे स्पष्ट होईल, मात्र त्या मुलीच्या आईने दुसर्या गटातून अर्ज दाखल केला असून त्या आमच्याबरोबर सुरक्षित ठिकाणी असल्याचे मंडलिक यांनी सांगितले.
जनता कुणाला एकटे पडू देत नाही, नेते बाजूला झाले तर जनता त्यांना साथ देते. 2009 मध्ये सदाशिवराव मंडलिक यांच्या निवडणुकीवेळी हे सिद्ध झाले असून आताही तेच होईल जनता सत्याच्या बाजूने उभा राहील, असेही संजय मंडलिक म्हणाले. यासंदर्भात समरजित घाटगे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही.
यासंदर्भात आणखी एक गोष्ट म्हणजे हसन मुश्रीफ यांनी सशाच्या शिकारीला जाताना एके 56 घेऊन जावे लागते, असे विधान केल्याचा दावा करून मंडलिक म्हणाले की, असा अतिरेकी विचार एखाद्याच्या मनात येतोच कसा? आपल्याला जे फोन येतात ते सगळे आपण माघार घ्यायची नाही हे सांगण्यासाठी येतात. विरोधक आजही आम्ही विरोधकांना दोन-तीन जागा देणार असल्याचे सांगत आहेत. मात्र आम्ही ताकदीने लढणार आहोत. कारण जनता आपल्या मागे आहे, असेही मंडलिक म्हणाले.