मुरगूड : ज्येष्ठ नेते शरद पवारसाहेब म्हणतात, त्यांना जे सोडून जातात त्यांचा पराभव होतो. परंतु, मी त्यांचा आदर ठेवून अत्यंत विनयाने सांगतो, 2009 ला लोकनेते स्व. खासदार सदाशिवराव मंडलिकसाहेब त्यांना सोडून गेले. ते पराभूत झाले नाहीत. उलट बंडखोरी करून त्यांनी क्रांतिकारी आणि ऐतिहासिक विजय मिळविला. तशीच पुनरावृत्ती या निवडणुकीतही होऊन पालकमंत्री हसन मुश्रीफ हे विक्रमी मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास माजी खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी व्यक्त केला. स्व खासदार मंडलिक यांना जनतेचे समर्थन होते. मुश्रीफ यांनाही जनतेचे समर्थन आहे, असेही ते म्हणाले. पालकमंत्री मुश्रीफ यांच्या प्रचारार्थ मुरगूड येथे आयोजित विराट जाहीर सभेत मंडलिक बोलत होते.
प्रा. मंडलिक पुढे म्हणाले, कागल तालुक्याचा इतिहास पाहता आजवरच्या राजा विरुद्ध प्रजा लढाईत आतापर्यंत प्रजाच विजयी होत आली आहे. या निवडणुकीतही तेच घडेल. पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, गेली 35-40 वर्षे समाजकारण आणि राजकारणात सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करीत आलो. या निवडणुकीतही मताधिक्याचे पाठबळ द्या. तुमचा हमाल म्हणून सेवा करीन. नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील म्हणाले, ज्या वेळी मंडलिक आणि पाटील एकत्र येतात त्यावेळी क्रांती होते. या निवडणुकीतही मंडलिक गट आणि पाटील गट एकत्र आहोत. मुश्रीफ यांच्या ऐतिहासिक विक्रमी मताधिक्याच्या रूपाने क्रांती होईल.
खा. धैर्यशील माने, अंबरिश घाटगे, पक्ष निरीक्षक अमृता घुले, विजय काळे, उत्तम कांबळे, दत्ताजी देसाई, अनिल सिद्धेश्वर, मधुकर पाटील, दिगंबर परीट यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर माजी आमदार संजयबालबा घाटगे, सुनीलराज सूर्यवंशी, रणजित मुडुकशिवाले, धोंडिराम चौगले, दिग्विजय पाटील, रणजित सूर्यवंशी, डॉ. सुनील चौगले, नामदेव भांदिगरे, अॅड. सुधीर सावर्डेकर, राजू आमते, विकास पाटील, धनाजी गोधडे, शिवाजी चौगले, जगन्नाथ पुजारी, सुहास खराडे, संजय मोरबाळे आदी उपस्थित होते. स्वागत नामदेवराव मेंडके यांनी केले. सूत्रसंचालन ए. एन. पाटील यांनी केले. आभार जयसिंग भोसले यांनी मानले.