

कोल्हापूर : जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागातील युवतीने नीलेश म्हाळुंगेकर याच्या विरोधात तीन-चार महिन्यांपूर्वी दिलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यामुळे माध्यमिक शिक्षण विभागातील अधीक्षक संजय गावडे अडचणीत आले आहेत. त्यांनी दाखविलेल्या उदासिनतेमुळे त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजाविण्यात आली असून, दि. 13 ऑक्टोबर रोजी खुलासा करण्यास सांगितले आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत माध्यमिक विभागात काम करणार्या एका युवतीशी कनिष्ठ सहायक नीलेश म्हाळुंगेकर लज्जा निर्माण होईल, असे वर्तन करत होता. त्यामुळे या युवतीने माध्यमिक शिक्षण विभागातील अधीक्षक गावडे यांच्याकडे सुरुवातीला तोंडी तक्रार दिली. महिनाभराने लेखी तक्रार दिली. परंतु, त्याची गांभार्याने दखल गावडे यांनी घेतली नाही. तक्रार करूनही कारवाई होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर ही युवती काही दिवस शांत राहिली. म्हाळुंगेकर याच्या वर्तनातही काही बदल झाला नाही. उलट युवतीला अधिक त्रास सुरू झाला. म्हणून या युवतीने थेट जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली. शुक्रवारी (दि. 3) सायंकाळी ही तक्रार दिल्याचे समजते.
सीईओ एस. कार्तिकेयन यांनी गंभीर दखल घेत मंगळवारी (दि. 7) म्हाळुंगेकरला तत्काळ निलंबित केले. चौकशीमध्ये या युवतीने तीन, चार महिन्यांपूर्वी अधीक्षक गावडे यांच्याकडे तक्रार केली होती. परंतु, त्यांनी याकडे गांभीर्याने पाहिले नाही. तसेच, ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली नाही म्हणून त्यांना बुधवारी कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे.