

कोपार्डे : कोल्हापूर-गगनबावडा राष्ट्रीय महामार्गावर वाकरे फाटा येथे रविवारी सकाळी नऊच्या सुमारास झालेल्या अपघातात सांगरूळ (ता. करवीर) येथील प्रणव संजय देसाई (वय 20) या युवकाचा मृत्यू झाला. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाचा एकमेव आधार असलेल्या प्रणवच्या मृत्यूने देसाई कुटुंब उघड्यावर पडले आहे.
प्रणव उचगाव येथील खासगी कंपनीत कामाला होता. सलग दोन शिफ्ट करून तो मोटारसायकलवरून (एमएच 09 एडी 7225) घरी परतत होता. वाकरे फाट्याजवळील पेट्रोल पंपासमोर कोल्हापूरच्या दिशेने जाणार्या गॅस सिलिंडर वाहतूक करणार्या ट्रकची (एमएच 10 डीटी 3685) त्याच्या मोटारसायकलला समोरून जोरदार धडक बसली. यात प्रणवच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने रुग्णवाहिकेतून कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
एप्रिल महिन्यात प्रणवच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यामुळे आई आणि दोन बहिणींची जबाबदारी त्याने लहान वयातच पेलली होती. प्रणवच्या अकाली जाण्याने देसाई कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली आहे.