

कोल्हापूर : पुणे-बंगळूर महामार्गावर सांगली फाटा ते उचगाव रेल्वे बीजदरम्यान उभारण्यात येणाऱ्या उड्डाण पुलाच्या कामाची मार्चअखेरपर्यंत ‘वर्क ऑर्डर’ द्या, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी कागल-सातारा सहापदरीकरणाच्या कामाचा आढावा घेतला.
जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, सांगली फाटा ते उचगाव रेल्वे बीजदरम्यान उड्डाण पूल उभारण्यात येणार आहे. त्यासह कोल्हापूर शहरात प्रवेश करण्यासाठी बास्केट बीजही उभारला जाणार आहे. कागल शहरातही महामार्गावर उड्डाण पूल उभारला जाणार आहे. या तीन कामांची निविदा प्रसिद्ध झाली आहे. त्याची सध्या छाननी सुरू आहे, या महिन्याअखेर ती पूर्ण होईल, त्यानंतर निविदा मंजूर होईल. मार्चअखेर या कामांची वर्क ऑर्डर दिली गेली जाईल, यादृष्टीने सर्व प्रक्रिया पूर्ण करा.
लक्ष्मी टेकडी येथील पुलाच्या आराखड्यात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार त्याचीही प्रक्रिया गतीने पूर्ण करून त्यानुसार तत्काळ कामाला सुरुवात करा, असे सांगत येडगे म्हणाले, ज्या ज्या ठिकाणी पुलाची कामे सुरू आहेत. तसेच, ती केली जाणार आहेत, अशा सर्व ठिकाणी प्रथम सर्व्हिस रोडचे काम गतीने पूर्ण करा. ते रस्ते काँक्रीटचे करा. यामुळे बांधकाम सुरू असताना महामार्गावरील वाहतुकीचा वेग कमी होणार नाही, ती सुरळीत राहील.
सहापदरीकरणाच्या कामात आतापर्यंत 43 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, या मार्गावर अद्याप फिनिशिंगचे काम पूर्ण झालेले नाही. उर्वरित छोटी-मोठी सर्व कामे गतीने पूर्ण करा, त्यासाठी कामांचे प्राधान्य ठरवून महिन्याभरात हे काम पूर्ण करा, अशा सूचनाही येडगे यांनी यावेळी दिल्या.