कोल्हापूर : कोल्हापूर खंडपीठाच्या लढ्यात दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे योगदान मोलाचे आहे. चाळीस वर्षांच्या खडतर संघर्षानंतर कोल्हापूरला सर्किट बेंच सुरू झाले आहे, ही अभिमानाची बाब आहे. आता शेंडापार्कातील 27 एकर क्षेत्रात कोल्हापूर खंडपीठ सुरू होण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा सांगलीतील ज्येष्ठ वकिलांनी गुरुवारी येथे बोलताना व्यक्त केली.
सांगली येथील ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. श्रीकांत जाधव, सांगली वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. अशोकराव वाघमोडे, जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख, राष्ट्रवादी शरद पवार (लिगल सेल) प्रदेश उपाध्यक्ष अॅड. प्रदीप पोळ, सांगली वकील संघटनेचे सदस्य अॅड. मुरलीधर खरात, अॅड. पंकज देशमुख, अॅड. पुष्कराज देशमुख, अॅड. चांगदेव शिंगाडे (सोलापूर) यांनी दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी सायंकाळी अभीष्टचिंतन केले. यावेळी झालेल्या चर्चेत सांगलीतील ज्येष्ठ विधीज्ञ व वकिलांनी डॉ. जाधव यांच्याकडे ही अपेक्षा व्यक्त केली.
ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. श्रीकांत जाधव म्हणाले, दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी कोल्हापूर, सांगलीसह सहा जिल्ह्यांतील वकील, पक्षकारांना बळ दिले. त्यांच्या पाठीशी भक्कम साथ दिली. डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्यामुळेच कोल्हापूरला सर्किट बेंच सुरू झाले आहे. कोल्हापूर खंडपीठ हा न्यायापासून वंचित असलेल्या हजारो गोरगरीब पक्षकारांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. ते प्रत्यक्षात साकार होण्यासाठी डॉ. जाधव यांनी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी आवाहन केले.