

Sangli Jail Prisoner Arrested
जयसिंगपूर : सांगली कारागृहातून पळालेला कैदी उदगाव बसस्थानकात आढळून आल्याने मिरज पोलिसांनी त्याला पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला. अशातही हा पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना मिरज व जयसिंगपूर पोलिसांनी फिल्मी स्टाईलने या कैद्याला आज (दि.१७) सकाळी १० च्या सुमारास ताब्यात घेतले. अर्ध्या तासाच्या थरारानंतर मिरज व जयसिंगपूर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकून मिरजला रवाना केले. त्यानंतर पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला. ही घटना पाहण्यासाठी उदगाव बसस्थानकावर प्रचंड मोठी गर्दी झाली होती.
सांगली येथील कारागृहामध्ये खुनाच्या गुन्ह्याची शिक्षा भोगत असलेला अजय दाविद भोसले (वय 35 वर्षे, रा.संजय गांधी झोपडपट्टी, तासगाव वेस, मिरज) हा सांगली जेलच्या तटावरून खंदकात उडी मारून पळून गेला होता. या घटनेबाबत सांगली पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला होता. आरोपीचा शोध घेण्यासाठी सांगली, मिरज पोलिसांना आदेश देण्यात आले होते. त्यानुसार मिरज पोलिसांना सोमवारी सकाळी आरोपी उदगाव बस स्थानक या ठिकाणी असल्याचे कळाल्यानंतर याठिकाणी मिरज पोलीस ठाण्याचे दीपक परीट यांनी येऊन जयसिंगपूर पोलिसांच्या मदतीने फिल्मी स्टाईलने कैदी भोसले याला ताब्यात घेतले.
सांगली जेलमध्ये खुनाच्या गुन्ह्याची शिक्षा भोगत असलेला अजय दाविद भोसले (रा.मिरज) हा 13 नोव्हेंबररोजी सांगली जेलच्या तटावरून खंदकात उडी मारून पळून गेला होता. सांगली व मिरज पोलीस भोसले यांच्या मागावर होते. आरोपी भोसले हा पोलिसांना चकवा देत फरार होता. मिरज गुन्हे प्रकटीकरण पथकास शोधण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले होते. सोमवारी मिरज पोलिसांना आरोपी भोसले हा उदगाव बसस्थानकावर असल्याचे माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि अण्णासाहेब गोदकर यांनी पो.शि.दीपक परीट यांना या ठिकाणी जाण्यास सांगितले दीपक परीट यांनी या ठिकाणी जाऊन शोध घेतला असता आरोपी अजय भोसले हा बस स्थानकावर मिळून आला.
दीपक परीट यांना पाहून आरोपी भोसले हा पळून जाण्याच्या तयारीत होता. दीपक परीट यांनी आरोपी भोसले यांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यानंतर तो पळून जाण्याचेही प्रयत्न करत होता. अशातच जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रवीण माने, पोलीस हवालदार निलेश मांजरे यांच्या मदतीने आरोपी भोसले यांना मिरज पोलीस ठाण्यात आणण्यात आले. आरोपी भोसले याची वैद्यकीय तपासणी करून सांगली पोलीस ठाण्याकडे ताब्यात देण्यात आले आहे.