kolhapur | मृत्यूनंतरही संदीपने दिले तिघांना जीवदान
कोल्हापूर : वाहन अपघातात जखमी होऊन उपचार सुरू असताना ब्रेनडेड झालेल्या शिवाजी पेठेतील आयरेकर गल्ली येथील तरुण संदीप शिवाजी पोवार (वय 36) याचे लिव्हर, दोन किडन्या दान करण्याचा धाडसी निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला आहे. ‘ग्रीन कॉरिडोर’मुळे राज्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या रुग्णांना जीवदान मिळणार आहे.
कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेणार्या रुग्णावर एक किडनी व पुणे येथील रुग्णालयात उपचार घेणार्या रुग्णांवर लिव्हर व किडनीचे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. संदीप शिवाजी पोवार (वय 36) व मित्र शैलेश कदम (वय 38) मंगळवारी (दि. 23) रात्री साडेअकरा वाजता जेवून दुचाकीवरून घरी जाताना साकोली कॉर्नरहून रंकाळ्याकडे जाणार्या रोडवर त्यांच्या दुचाकीला कारने जोराची धडक दिली. यामध्ये संदीप व शैलेश गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले.
संदीपच्या डोक्याला जोराचा मार लागल्याने तो बेशुद्ध होता. त्याच्यावर व्हेंटिलेटरवर उपचार सुरू होते. डॉक्टरांनी संदीपला डोक्याला गंभीर मार लागल्याने प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले. मेंदूतज्ज्ञांनी तपासणी केली असता त्याचा ब्रेनडेड झाल्याचे निदान झाल्याने पुढे उपचार होणार नाहीत, असे पोवार कुटुंबीयांना सांगितले. डॉक्टरांनी अवयवदान करण्यासाठी नातेवाईकांचे समुपदेशन केले. संदीपचा भाऊ श्रीकांत पोवार याने डोळ्यांतील अश्रूंना थोपवत हुंदका सावरत अवयवदानासाठी सहमती दर्शवली. आई अंजली, बहीण संध्या यांनीही दु:खाचा डोंगर पचवला.
रंकाळा येथे उपचार सुरू असलेल्या ठिकाणी अवयदान शस्त्रक्रियेची सोय उपलब्ध नव्हती. त्यामुळे बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास संदीप याला नागाळा पार्क येथील एका रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणीसाठी पुणे येथील वैद्यकीय पथक दाखल झाले. यानंतर मध्यरात्री तीन वाजता किडनी व लिव्हर शस्त्रक्रिया करण्यात आली. एक किडनी कोल्हापूर येथे, तर दुसरी किडनी, लिव्हर पुणे येथे सकाळी 7 वाजता ‘ग्रीन कॉरिडोर’ अॅम्ब्युलन्सने पाठवण्यात आली. संदीप पोवार याच्या मागे आई, भाऊ, विवाहीत बहीण असा परिवार आहे.
मृत्यूच्या वृत्ताने मित्रांनाही धक्का
संदीप इलेक्ट्रिशनचे काम करत होता. तो कष्टाळू आणि मन मिळावू होता. त्याची मैत्रीची विन घट्ट होती. त्याच्या मृत्यूने मित्रांनादेखील जबर धक्का बसला आहे.

