Sand Mining Ban | महाराष्ट्रात वाळू उपसा बंदीमुळे महापुराला हातभार!

नदीपात्रांची खोली एक ते तीन मीटरने झाली कमी; तातडीने खोलीकरणाची आवश्यकता
Sand Mining Ban |
Sand Mining Ban | महाराष्ट्रात वाळू उपसा बंदीमुळे महापुराला हातभार!
Published on
Updated on

सुनील कदम

कोल्हापूर : राज्यातील नदी पात्रांमधील वाळू उपसा बंदीमुळेही गेल्या काही वर्षांत पुराला आणि महापुराला काही प्रमाणात हातभार लागत असल्याची बाब पुढे येऊ लागली आहे. कारण वाळू उपशाअभावी राज्यातील नदीपात्रांची खोली एक ते तीन मीटरने कमी झाल्याचे दिसून येत आहे. हरित लवादाच्या निर्णयामुळे नऊ वर्षांपूर्वी म्हणजे १९ एप्रिल २०१७ पासून राज्यावर वाळू उपसा बंदी लादली गेली. हरित लवादाच्या निर्णयामुळे राज्यातील नदी पात्रांमधील जवळपास ९० टक्के वाळू उपसा बंद असल्याचे दिसून येते.

वार्षिक गरज ३ कोटी ब्रास

राज्यातील शासकीय आणि खासगी क्षेत्रातील बांधकामांना मिळून वर्षाकाठी जवळपास तीन कोटी ब्रास (सुमारे ७५ लाख ट्रक) वाळू लागते; मात्र सध्या राज्यात वाळूची उपसाबंदी लागू असल्याने लागणाऱ्या वाळूपैकी जवळपास दोन कोटी ब्रास वाळूची गरज कृत्रिम वाळूपासून भागविली जात आहे. शासकीय बांधकामांमध्ये तर मागील सात वर्षांपासून १०० टक्के कृत्रिम वाळूचा वापर सुरू करण्यात आलेला आहे.

नवीन धोरण कागदावरच!

नदी पात्रांमधील वाळू उपशाबाबत राज्य शासनाने गेल्यावर्षी ८ एप्रिल २०२५ रोजी नवीन वाळू उपसा धोरण लागू केले आहे. या नवीन धोरणानुसार वाळूचा उपसा करताना हरित लवादाचे सर्व निकष तंतोतंत पाळावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे नदी पात्रातील वाळूचे प्लॉट, प्रमाण आणि रॉयल्टी निश्चित करणे, त्याची काटेकोर अंमलबजावणी करणे, यासाठी महसूल आणि पोलिस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अन्य विविध खात्यांतील स्थानिक अधिकारी व पदाधिकाऱ्यांची समिती गठीत करण्याचे नियोजन आहे. मात्र, यातील काटेकोर निकष आणि भविष्यातील वादविवाद विचारात घेऊन या बाबतीत कुणीच काही निर्णय घेण्यास तयार नाही. परिणामी, राज्यात नवीन वाळू धोरणाची अंमलबजावणी केवळ कागदावरच राहिल्याचे दिसून येते.

नदीपात्रे झाली उथळ

नद्यांमधील वाळू उपसा मागील आठ वर्षांपासून बंद असल्यामुळे नदीपात्रात वाळू, रेती आणि माती यांची भर पडून गेल्या काही वर्षांत नद्यांची पात्रे उथळ झालेली दिसत आहेत. एक मीटरपासून ते तीन-तीन मीटरपर्यंत नदीपात्रांची खोली कमी झालेली दिसत आहे. परिणामी, जरा मोठा पाऊस झाला की, नदी पात्रांमधील पाणी अवघ्या एक-दोन दिवसांत पात्राबाहेर पडताना दिसत आहे. पूर्वी सलग दहा-पंधरा दिवस मुसळधार पाऊस झाल्यानंतर अथवा धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यानंतर नद्यांना येणारे पूर आजकाल थोड्याशा पावसामुळेही येताना दिसत आहेत. वरील बाब विचारात घेता हरित लवादाच्या निकषांना कुठेही बाधा येऊ न देता पुन्हा एकदा नव्याने नद्यांमधील वाळू उपसा सुरू करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात येत आहे.

बहुतेक नद्यांचे प्रवाह झाले संथ...

नदीपात्राला अत्यंत कमी उतार असल्यामुळे कृष्णा नदीचा प्रवाह हा नेहमीच संथ असतो. त्याच्या तुलनेत वारणा आणि पंचगंगा नद्यांचा प्रवाह वेगवान असतो; मात्र गेल्या काही वर्षांत कृष्णेचा प्रवाह आणखी संथ झालेला दिसतो, तर वारणा आणि पंचगंगा नद्यांचे प्रवाहसुद्धा अतिशय संथ झालेले दिसतात. राज्यातील बहुतेक सगळ्या नद्यांचे प्रवाह अशाच पद्धतीने दिवसेंदिवस संथ होताना दिसत आहेत. नदीपात्रांची खोली वाळू उपशाअभावी कमी कमी होत गेल्याचा हा सगळा परिणाम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news