

Satish Yadav Dead Body Malapude Katalewadi Kolhapur crime
सरूड : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असताना लग्नास नकार दिल्याच्या रागातून प्रेयसी समीक्षा नरसिंगे-बागडी (रा.कसबा बावडा) हिचा मनेर मळा, सरनोबतवाडी (ता.करवीर) येथे धारधार शस्त्राने खून करून पसार झालेल्या संशयित आरोपी सतिश यादव या प्रेमवीरानेही आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना समोर आली आहे. शाहूवाडी तालुक्यातील माळापुडे -कातळेवाडी गावच्या हद्दीत बांद्रेवाडी धरणाच्या परिसरात कासारी नदीकाठच्या झाडाला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेतला सतीश याचा मृतदेह गुरूवारी (दि. ५) सकाळी काही वाटसरू नागरिकांच्या निदर्शनास आला.
दरम्यान, शाहूवाडीचे सहायक पोलीस उपनिरीक्षक अभिजित पाटील, ठाणे अंमलदार हणमंत कुंभार, पोलीस हेडकॉन्स्टेबल आयुब मुलाणी यांनी घटनास्थळी जाऊन स्थानिक पंच साक्षीदारांसमक्ष घटनेचा पंचनामा केला. माळापुडे कातळेवाडीचे पोलीस पाटील बाजीराव साळोखे, उमेश संकपाळ, ग्रामपंचायत कर्मचारी संतोष पाटील आदींच्या मदतीने झाडावरील लटकता मृतदेह खाली उतरवून दुपारी पावणेदोनच्या सुमारास मलकापूर ग्रामीण रुग्णालयाकडे शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.
खुनाच्या घटनेनंतर पसार झालेल्या आरोपी सतीश यादव याच्या मागावरील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह पोलिसांची पथके त्याचा शोध घेत होती. यादरम्यान आरोपी राहत असलेल्या कोल्हापूर व उंड्री (ता.पन्हाळा) येथील ठिकाणी पोलिसांनी छापा कारवाई केली होती. मात्र, आरोपीचा ठावठिकाणा लागत नव्हता. गुरूवारी (दि. ५) सकाळी बांद्रेवाडी धरण परिसरातील रस्त्यावरून जणा येणाऱ्या काही वाटसरू नागरिकांना कासारी नदीकाठी झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन लटकता मृतदेह निदर्शनास आला.
त्यानंतर स्थानिक पोलीस पाटील बाजीराव साळोखे यांच्याकडून शाहूवाडी पोलीस व तपास यंत्रणेला या घटनेची माहिती मिळाली. आरोपी सतीश यादव याने काल (बुधवारी) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास गळफास लावून घेतला असल्याची प्राथमिक माहिती शाहूवाडीचे सहायक पोलीस उपनिरीक्षक अभिजित पाटील यांनी दिली. मृत आरोपी सतीश यादव याचे उंड्री (ता.पन्हाळा) हे मुळगाव सदर घटनास्थळापासून सहा ते सात किलोमीटर अंतरावर आहे. त्याच्या पाठीमागे आई, भाऊ, विवाहित बहीण असा परिवार आहे.
दरम्यान, मृत आरोपी सतीश यादव याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असल्याची माहिती पुढे आली असून तो क्लब, जुगार, मद्यविक्री अशा बेकायदा व्यवसायात गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय होता. अवैध धंदे किंबहुना वाम मार्गातून बाहेर पडावा, यासाठी अनेकदा समजावण्याचा प्रयत्न करूनही तो घरच्यांना प्रतिसाद देत नव्हता. या कारणास्तव कुटुंबीयांनी देखील त्याच्याशी फारकत घेत चार हात अंतर राखल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे.