

म्हाकवे : पालकमंत्री सात हजार कोटी रुपयांची विकासगंगा कागल, गडहिंग्लज उत्तूर विभागात आणली म्हणतात. यामध्ये त्यांनी रस्ते व गटर्सच्या तुलनेत आरोग्य विभागाच्या कामाकडे दुर्लक्ष केले. स्वतःला महाडॉक्टर म्हणून घेणार्या पालकमंत्र्यांमुळेच कागल, गडहिंग्लज, उत्तूर विभागातील आरोग्य विभागच आजारी पडला आहे, अशी घणाघाती टीका महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह घाटगे यांनी केली. पिंपळगाव बुद्रुक (ता. कागल) येथे त्यांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेवेळी ते बोलत होते. अभिजित तापेकर यांनी आपली उमेदवारी मागे घेत घाटगे यांना कार्यकर्त्यांसह पाठिंबा दर्शवल्याबद्दल त्यांचा घाटगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
घाटगे म्हणाले, पालकमंत्र्यांंच्या मर्जीतील मोजके चार कॉन्ट्रॅक्टर मोठे झाले. तत्कालीन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्याकडे पाठपुरावा करून पिंपळगाव बुद्रुक आरोग्य केंद्रासाठी निधी मंजूर करून आणला होता; मात्र केवळ श्रेयवादातून त्यांनी तो रद्द करून त्यास पुन्हा मंजुरी घेतली. यामुळे आरोग्य केंद्र इमारतीचे काम रखडले. या पापास पालकमंत्री जबाबदार आहेत. प्रदीप पाटील, स्नेहल पाटील, अर्जुन माने यांनी मनोगत व्यक्त केले. सभेस शाहू कारखान्याचे संचालक डी. एस. पाटील, शिवानंद माळी, सचिन पाटील, रणजित हवलदार, चंद्रकांत दंडवते, स्वाती पाटील, गीता परीट, प्रदीप कांबळे, विकास कांबळे, प्रकाश माने, आनंदा सूर्यवंशी, नामदेव मांगोरे, यशवंत सूर्यवंशी आदी उपस्थित होते. संभाजी ताशिलदार यांनी स्वागत केले.