kolhapur Municipal employees | पगार लांबला... घरखर्चाचा गाडा अडखळला!

महापालिकेच्या कर्मचार्‍यांची उधार-उसनवारीवर गुजराण
Kolhapur Municipal Corporation
Kolhapur municipal corporationPudhari File Photo
Published on
Updated on

सतीश सरीकर

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील नागरिकांना सेवा देणार्‍या महापालिकेतील कर्मचार्‍यांवरच आता आर्थिक संकटाचे सावट आले आहे. महापालिकेतील तब्बल पाच हजारांहून अधिक कर्मचार्‍यांचा फेब्रुवारी महिन्याचा पगार मार्चची दहा तारीख उलटत आली तरी अद्याप जमा झालेला नाही. परिणामी अनेक कर्मचार्‍यांच्या घरखर्चाचा गाडा अडखळला असून उधार-उसनवारी करून उदरनिर्वाह करावा लागत आहे.

महिन्याच्या सुरुवातीला होणारा पगार हा कर्मचार्‍यांच्या घरासाठी आर्थिक आधार असतो. त्याच पैशावर घरभाडे, गृहकर्जाचे हप्ते, लाईट-पाणी बिल, किराणा, मुलांची शाळा-कॉलेजची फी, तसेच घरातील वयोवृद्धांच्या औषधांचा खर्च भागविला जातो. मात्र पगारच न झाल्याने कर्मचार्‍यांच्या कुटुंबांचे गणित कोलमडले आहे. अनेक कर्मचार्‍यांनी बँकांकडून घेतलेल्या गृहकर्जाचे हप्ते दर महिन्याला ठरलेल्या तारखेला वळते होतात. पगार उशिरा झाल्यामुळे बँक खात्यात रक्कम नसल्याने हप्ते थकण्याची भीती निर्माण झाली आहे.

काही कर्मचार्‍यांच्या मुलांच्या शाळा-कॉलेजची फी भरायची मुदतही संपत आली आहे. फी न भरल्यास उशीर शुल्क आकारले जाईल किंवा विद्यार्थ्यांना वर्गात बसण्यास अडचणी येतील, अशी भीती पालकांना सतावत आहे. त्यामुळे काही जणांनी नातेवाईकांकडून किंवा मित्रांकडून पैसे उधार घेण्याचा मार्ग स्वीकारला आहे.

घरातील वयोवृद्धांच्या औषधोपचाराचाही प्रश्न अनेक कुटुंबांपुढे उभा राहिला आहे. औषधे थांबविणे शक्य नाही, पण पैसेही नाहीत, अशी हतबलता काही कर्मचार्‍यांनी व्यक्त केली. त्यामुळे काहींना खासगी सावकारांकडे धाव घ्यावी लागत असल्याचेही समोर येत आहे. महापालिकेतील कर्मचारी शहराच्या स्वच्छतेपासून ते पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, प्रशासन अशा विविध विभागांत दिवसरात्र काम करत असतात. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी धावणार्‍या या कर्मचार्‍यांनाच आता आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागत आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच निर्माण झालेली ही आर्थिक कोंडी अनेक कुटुंबांसाठी मोठी चिंता ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news