Sai Jadhav | ‘आयएमए’मध्ये 93 वर्षांच्या इतिहासात सुवर्णक्षण; जयसिंगपूरच्या सई जाधव पहिल्या महिला लेफ्टनंट

डेहराडूनच्या अकादमीतून प्रशिक्षण पूर्ण करून उत्तराखंडच्या 130 बटालियनमध्ये होणार रुजू
Sai Jadhav from Jaysingpur becomes first woman lieutenant
डेहराडून : वडील मेजर संदीप जाधव व आईसह सई जाधव आणि कुटुंबीय.Pudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूरच्या मातीमध्ये जिद्द, शिस्त आणि देशभक्ती रुजलेली आहे, याचा प्रत्यय कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरची कन्या सई संदीप जाधव या अवघ्या 23 वर्षांच्या तरुणीने सार्‍या देशाला दिला. डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकादमीच्या (आयएमए), 93 वर्षांच्या इतिहासात प्रथमच एक महिला अधिकारी कॅडेट म्हणून प्रशिक्षण पूर्ण करून लेफ्टनंटपदाची सूत्रे हाती घेण्याचा मान सई हिने अवघ्या 23 व्या वर्षी मिळवला.

पणजोबांपासून वडिलांपर्यंत घरात सुरू असलेल्या देशसेवेचा वारसा पुढे चालवण्याचे स्वप्न सईने शालेयवयातच पाहिले. त्याद़ृष्टीने मेहनतीने प्रवास सुरू केला आणि देशाच्या सैन्यदलात कोल्हापूर जिल्ह्याचे नाव कोरत अभिमानाचा झेंडा रोवला. 2 जानेवारी 2026 या दिवशी सई उत्तराखंड येथील 130 बटालियनमध्ये लेफ्टनंटपदी रुजू होणार आहे.

‘आयएमए’ ही संस्था फक्त पुरुष प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देते. मात्र, सईने ही चौकट मोडून प्रशिक्षणपूर्व प्रवेश परीक्षा आणि मुलाखत इथपर्यंत बाजी मारली. या दोन टप्प्यांपर्यंत पोहोचणे हे तिच्यासाठी आव्हान होते. देशातून केवळ तीन मुलींची निवड झाली होती. मात्र, प्रवेश परीक्षा व मुलाखतीच्या गुणवत्ता यादीत ती अव्वल आली. दि. 13 डिसेंबर 2025 रोजी सई हिची टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंटपदावर नियुक्ती झाल्याचे घोषित करण्यात आले. तेव्हा सईच्या खांद्यावर तारे लावताना तिचे वडील मेजर संदीप जाधव व आई ज्योती यांचा ऊर अभिमानाने भरून आला.

वडिलांच्या पोस्टिंगमुळे सईचे शिक्षण देशातील विविध राज्यांमध्ये झाले. शालेय शिक्षण जयसिंगपूर हायस्कूलमध्ये, तर अंदमान-निकोबार येथेही तिने शालेय शिक्षणाचे धडे गिरवले. बेळगावमध्ये अकरावी व बारावीचे शिक्षण घेतल्यानंतर कोल्हापुरातील विवेकानंद कॉलेजमधून तिने पदार्थविज्ञान विषयात पदवी, तर पुण्यातील सिंबॉयसिसमधून एमबीए पदवी संपादन केली. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच सईने स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आर्मीमध्ये जाण्यासाठीच्या स्वप्नांच्या दिशेने पाऊल टाकण्यास सुरुवात केली. वक्तृत्व, वाचन, ट्रेकिंग अशा अवांतर कलागुणांतून ती स्वत:ला घडवत राहिली.

देशसेवेचा वारसा जपणारी लेक

सईचे पणजोबा सुभेदार शंकरराव जाधव हे ब्रिटिश सैन्यदलात होते, तर वडिलांचे मामा अनिल घाटगे हे फायटर पायलट होते. सई हिचे वडील मेजर संदीप जाधव गेल्या 14 वर्षांपासून प्रादेशिक सैन्यात कार्यरत आहेत. कुटुंबातील तीन पिढ्यांपासून घरात देशसेवेचा वारसा असल्याने सईच्या मनातही देशसेवेचे बीज रोवले गेले. मोठी झाल्यावर मी आर्मीमध्ये जाणार, असे सांगणारी सई तिच्या स्वप्नाला आकार देत गेली. वडिलांनी तिच्या ध्येयाला प्रोत्साहनाचे पंख दिले.

प्रादेशिक सैन्यात कार्यरत पहिल्यांदाच बाप-लेक

प्रादेशिक सैन्यात वडील आणि मुलगी काम करण्याचा योग पहिल्यांदाच जुळून आला आहे. आजपर्यंत या विभागात वडील आणि मुलगी यांची निवड कधीच झाली नव्हती. सईचे वडील संदीप हे प्रादेशिक सैन्यदलात मेजरपदावर आहेत, तर सईने लेफ्टनंटपदाचे आकाश कवेत घेतले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news