

विशाळगड : सह्याद्री व्याघ्र राखीव अंतर्गत आंबा वनपरिक्षेत्रातील निवळे व गोठणे परिसरात लागलेल्या भीषण वनवा प्रकरणी वन विभागाने गोपनीय आणि तांत्रिक तपासाच्या जोरावर आणखी सहा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. शाहुवाडी न्यायालयाने त्यांना २५ मे २०२६ पर्यंत चार दिवसांची वन कोठडी सुनावल्याची माहिती आंबा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप कोकितकर यांनी दिली.
सावळा धोंडीबा झोरे, नागेश बापू शेळके, विठ्ठल जनू गावडे, बबन बाबू गावडे, धोंडीबा बाबू गावडे आणि जनू ऊर्फ जयराम रामू गावडे (सर्व रा. अंबाईवाडा, शाहूवाडी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. ५ मे रोजी घडलेल्या या घटनेनंतर तपासादरम्यान ट्रॅप कॅमेऱ्यातील छायाचित्रांच्या आधारे सर्वप्रथम बापू चौगुले याला ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर बाबुराव येडगे, भागोजी कोळेकर व नामदेव येडगे यांना अटक करण्यात आली होती. याच साखळीचा पुढील तपास करताना हे नवीन ६ आरोपी निष्पन्न झाले.
जंगलाला आग लावून वन्यजीव व नैसर्गिक संपत्ती धोक्यात आणणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा वन्यजीव विभागाने दिला आहे. सदर कारवाई क्षेत्र संचालक तुषार चव्हाण, उपसंचालक स्नेहलता पाटील, सहायक वनसंरक्षक संदेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप कोकितकर व वनपाल सुरेश चरापले, मनिषा देसाई, वनरक्षक राजेंद्र बनकर, विशाल पाटील, कु. अंजली नवले, वाहनचालक व वनमजूर या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.