

विशाळगड : सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रातील नैसर्गिक संपत्तीशी खेळणाऱ्या समाजकंटकांचा वनविभागाने पर्दाफाश केला आहे. आंबा वनपरिक्षेत्रातील निवळे-गोठणे परिसरात भीषण आग लावून वन्यजीवांचे प्राण धोक्यात घालणाऱ्या चार जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून, शाहुवाडी न्यायालयाने त्यांना चार दिवसांची वनकोठडी सुनावली आहे.
असा लागला छडा
५ मे रोजी लागलेल्या वनव्यानंतर वनविभागाचे पथक जळीत क्षेत्राची पाहणी करत होते. यावेळी वन्यप्राण्यांच्या हालचाली टिपण्यासाठी लावलेला एक 'ट्रॅप कॅमेरा' चोरीला गेल्याचे लक्षात आले. मात्र, नजीकच्या दुसऱ्या कॅमेऱ्याने चोरांची ही चाल उलटवून लावली. या कॅमेऱ्यात चार संशयितांची छायाचित्रे कैद झाली होती. त्यातील एकाचा चेहरा अंशतः स्पष्ट दिसल्याने तपासाला गती मिळाली.
टॉवर लोकेशन आणि सापळा
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वनविभागाने कोकरूड-इस्लामपूर मार्गावरील बिऊर फाटा येथे सापळा रचला आणि मुख्य संशयित बापू बाजू चौगुले याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, या गुन्ह्यात सामील असलेल्या बाबुराव येडगे, भागोजी कोळेकर आणि नामदेव येडगे असून बाबुराव धोंडीबा येडगे, भागोजी बाबुराव कोळेकर व नामदेव लहू येडगे (रा. सर्व कोतोली धनगरवाडा, ता. शाहूवाडी) या अन्य तिघांची नावे समोर आलीत.
क्षेत्र संचालक तुषार चव्हाण आणि उपसंचालक स्नेहलता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप कोकितकर व त्यांच्या चमूने ही यशस्वी कारवाई केली. वनविभागाच्या या 'सर्जिकल स्ट्राईक'मुळे जंगल परिसरात अवैध कृत्य करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
"सह्याद्रीचा वनवा केवळ झाडे जाळत नाही, तर संपूर्ण परिसंस्था नष्ट करतो. असे कृत्य करणाऱ्यांना कायद्याचा कठोर दट्ट्या बसेलच, हा आमचा इशारा आहे."— वन्यजीव विभाग, सह्याद्री व्याघ्र राखीव.