

आशिष शिंदे
कोल्हापूर : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सध्या एका आगळ्यावेगळ्या ‘स्वयंवरा’ची स्थिती तयार झाली आहे. या व्याघ्र प्रकल्पात टी 1 सेनापती, टी 2 सुभेदार आणि नुकताच वन विभागाच्या कॅमेर्यात कैद झालेला नवा पाहुणा टी-9 शिलेदार यापैकी तारा ही वाघीण आपला साथीदार म्हणून नेमकी कुणाची निवड करणार, याकडे वन्यजीव अभ्यासकांचे लक्ष लागले आहे. शिलेदार हा वाघ सध्या ताराच्या मागावर असल्याची माहिती सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या संचालकांनी दिली.
चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून शिलेदार या नवीन वाघाचा वावर वाढला असून, तो सतत तारा या वाघिणीचा वावर असलेल्या क्षेत्रात (टेरिटरीमध्ये) दिसून येत आहे; मात्र सेनापती आणि सुभेदार यासारख्या अनुभवी नरांच्या उपस्थितीत तारा कुणाला आपला साथीदार म्हणून पसंती देते हे पाहावे लागणार आहे. या तिन्ही नरांमध्ये स्वतःचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी जणू चढाओढ लागली असून, सह्याद्रीच्या दर्याखोर्यात या बड्या वाघांच्या हालचालींनी वन्यजीव प्रेमींचे कुतूहल शिगेला पोहोचले आहे.
वाघांची संख्या सातवर
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणखी एका नवीन नर वाघाची नोंद झाल्याने वाघांची एकूण संख्या आता सातवर पोहोचली आहे. सध्या व्याघ्र प्रकल्पात टी 1 सेनापती, टी 2 सुभेदार, टी 3 बाजी, टी 4 चंदा, टी 5 तारा, टी 6 हिरकणी, टी 9 शिलेदार यांचा वावर आहे.
सह्याद्रीत असा आला शिलेदार
गेल्या दोन महिन्यांपासून चांदोली राष्ट्रीय उद्यानातील विविध कॅमेरा ट्रॅप्समध्ये हा वाघ कैद होत होता. वन विभागाने या नवीन वाघाला एसटीआर टी-9 असे सांकेतिक क्रमांक दिले असून, स्थानिक गाईडस्नी त्याचे नामकरण ‘शिलेदार’ असे केले आहे. डिसेंबर 2024 मध्ये सावंतवाडीत पहिल्यांदा कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झालेल्या एसकेटी-21 या तरुण नर वाघाने एका महिन्यात टायगर कॉरिडॉरचा वापर करत दाजीपूर (राधानगरी) परिसरात धडक दिली. जानेवारी-फेब—ुवारी 2026 मध्ये या वाघाचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आगमन झाले आहे.