‘सह्याद्री’त १२० नद्यांचे उगमस्थान, तरीही पाणी जाते वाहून!

संपूर्ण दक्षिण भारतातील पाण्याचा मुख्य स्रोत; जंगलातील मानवी हस्तक्षेप कमी करण्याची आवश्यकता
‘सह्याद्री’त १२० नद्यांचे उगमस्थान, तरीही पाणी जाते वाहून!
‘सह्याद्री’त १२० नद्यांचे उगमस्थान, तरीही पाणी जाते वाहून!
Published on: 
Updated on: 

सुनील कदम

कोल्हापूर : सह्याद्री म्हणजे संपूर्ण दक्षिण भारतातील पाण्याचा मुख्य स्रोत आहे. कारण सह्याद्रीतून तब्बल १२० नद्या उगम पावतात. जवळपास ५,००० टीएमसी पाणी महाराष्ट्रासह दक्षिण भारताला उपलब्ध होते. यातील हजारो लिटर पाणी वाहून जाते. सह्याद्रीतील मानवी हस्तक्षेप कमी करण्याचीही आवश्यकता आहे.

महाराष्ट्रातील गोदावरी, कृष्णा, कोयना, वारणा, मोरणा, भीमा, पंचगंगा, कावेरी, प्रवरा, मुळा, गिरणा, पांझरा, उल्हास, दूधगंगा, वेदगंगा, कुंभी, कासारी, घटप्रभा, भोगावती, तुळशी, वैतरणा, दामोदर, वशिष्ठी, सावित्री या प्रमुख नद्यांसह लहान-मोठ्या जवळपास ३३ नद्या सह्याद्रीतून उगम पावतात. कर्नाटकात तुंगभद्रा, घटप्रभा, मलप्रभा या प्रमुख नद्यांसह इतर काही छोट्या-मोठ्या नद्या सह्याद्रीत उगम पावतात. गोव्यातील मांडवी, झुआरी, तेरेखोल, शापोरा, तळपदी, गालजीबाग, साळवेरी, म्हादई इत्यादी नद्यांचे उगमस्थान सह्याद्रीत आहे. तामिळनाडूतील कावेरी, तामिराबरानी, वैगई, भवानी, अमरावती इत्यादी नद्या सह्याद्रीत उगम पावतात. केरळातील पेरियार, निला, पंबा, चालियार, चलाकुडी, कबानी, भवानी, पांबर इत्यादी नद्यांचे उगमस्थान सह्याद्रीतच आहे. यावरून सह्याद्रीचे महत्त्‍व कुणाच्याही लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. या नद्याच महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या जीवन वाहिन्या आहेत. या सात राज्यांमध्ये प्रामुख्याने याच नद्यांच्या भरोशावर अनेक जलसिंचन आणि जलविद्युत प्रकल्प उभा राहिलेले आहेत.

राज्याला जवळपास ३००० टीएमसी पाणी

सह्याद्रीच्या माध्यमातून दक्षिण भारताला पाण्याचा अफाट साठा उपलब्ध होता. एकट्या महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तरी सह्याद्रीतून राज्याला जवळपास ३००० टीएमसी पाणी उपलब्ध होते. कर्नाटक, गोवा, तामिळनाडू आणि केरळलाही सुमारे २००० टीएमसी पाणी केवळ सह्याद्रीमुळे उपलब्ध होते. याशिवाय आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचीही पाण्याची प्रमुख भिस्त सह्याद्रीतून उपलब्ध होणाऱ्या पाण्यावरच आहे. याचा अर्थ देशातील सात राज्ये आणि त्या सात राज्यांचा आणि देशातील या ४० टक्के भूभागाचा पाण्याचा मुख्य स्रोत हा सह्याद्रीच आहे. त्यामुळे पर्यावरण रक्षणाच्या माध्यमातून पाण्याचा हा स्रोत वर्षांनुवर्षे जतन करण्याची आवश्यकता आहे.

डोंगर पोखरणीमुळे भूस्खलनाचे प्रमाण वाढले

मागील दहा-वीस वर्षांत केरळातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांची बेसुमार पोखरण झालेली आहे. त्याचा परिणाम म्हणून चार वर्षांपूर्वी केरळमध्ये हाहा:कार उडाला होता. डोंगर खचले, प्रचंड प्रमाणात भूस्खलन होऊन नद्यांच्या प्रवाहांची दिशाच बदलून गेली. नद्या नागरी वस्तीत शिरल्या आणि पर्यावरणाचा पुरता बिमोड झाला. सह्याद्रीच्या पोखरणीमुळे महाराष्ट्रातही गेल्या काही वर्षांत भूस्खलनाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. शेकडो वर्षांपासून उभ्या असलेल्या नागरी वस्त्या रातोरात डोंगराच्या कड्याखाली गाडल्या जात आहेत. सह्याद्रीत दिवसेंदिवस वाढत चाललेल्या मानवी हस्तक्षेपाचा हा परिपाक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.