

कोल्हापूर : सध्या कोल्हापूर-पुणे मार्गावर धावत असलेली ‘सह्याद्री एक्स्प्रेस’ या महिनाअखेरीस मुंबईपर्यंत सुरू होणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना दिली. लॉकडाऊन काळात ‘सह्याद्री एक्स्प्रेस’ बंद करण्यात आली होती. नंतर ती केवळ पुण्यापर्यंत सुरू करण्यात आली.
कोल्हापूरच्या रेल्वेबाबतच्या समस्या व जनतेकडे नेत्यांच्या होत असलेल्या दुर्लक्षाबाबत दै. ‘पुढारी’ने ‘नेत्यांची सोय ः जनतेची गैरसोय’ वृत्तातून जनतेच्या रेल्वेविषयक समस्यांना वाचा फोडली होती. याबाबत जनतेतून दै. ‘पुढारी’च्या अभिनंदनाचे संदेश मोठ्या प्रमाणावर आले आहेत. ‘सह्याद्री एक्स्प्रेस’ लॉकडाऊनच्या काळात बंद करण्यात आली. लॉकडाऊननंतर जनतेच्या मागण्यांची दखल घेत ही एक्स्प्रेस कोल्हापूर ते पुणे या मार्गावर सुरू करण्यात आली. ती मुंबईपर्यंत न्यावी, अशी मागणी जनतेतून करण्यात येत होती. मात्र, त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत होते. लवकरच ‘सह्याद्री एक्स्प्रेस’ मुंबईपर्यंत नेण्यात येईल. या मार्च महिन्याअखेरीपासूनच ‘सह्याद्री एक्स्प्रेस’ मुंबईपर्यंत जाईल, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. आपण रेल्वेच्या संसदीय समितीमध्ये असून, रेल्वेच्या प्रश्नांबाबत तातडीने आवाज उठवला जाईल, असेही ते म्हणाले.