

नवी दिल्ली : साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचे साहित्य अकादमी 23 ‘युवा’ आणि 24 ‘बाल’ पुरस्कारांची घोषणा बुधवारी करण्यात आली. महाराष्ट्रामधून मराठी आणि सिंधी भाषेतील साहित्यिकांची निवड युवा साहित्य अकादमी पुरस्कारासाठी झाली आहे. मराठी भाषेसाठी प्रदीप कोकरे यांना ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ या कादंबरीसाठी आणि सिंधी भाषेतील मंथन बचाणी यांच्या ‘पांधीअडो’ या कविता संग्रहाची ‘युवा’ साहित्य अकादमी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली; तर ‘बाल’साहित्य अकादमी पुरस्कारासाठी कवी डॉ. सुरेश सावंत यांची त्यांच्या ‘आभाळमाया’ या कविता संग्रहासाठी निवड करण्यात आली.
साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत साहित्य अकादमीच्या वर्ष 2025 साठी ‘युवा’ आणि ‘बाल’साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. प्रत्येक भाषेतील पुरस्कारांसाठी तीन सदस्यीय निर्णायक
मंडळाच्या निर्धारित निवड प्रक्रियेचा अवलंब करत उत्कृष्ट साहित्य लेखनाची निवड पुरस्कारांसाठी करण्यात आली. या पुरस्कारांचे स्वरूप समानचिन्ह आणि 50 हजार रुपये रोख असे आहे. डोंगरी भाषेतील युवा पुरस्कार विजेत्याची घोषणा सध्या करण्यात आलेली नाही.
मराठी साहित्यातील संवेदनशील आणि होतकरू युवा लेखक प्रदीप कोकरे यांच्या ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ या कादंबरीला 2025 चा मराठी भाषेसाठीचा युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ ही कादंबरी आधुनिक तरुण पिढीच्या भावविश्वाचे आणि त्यांच्या जीवनातील संघर्षांचे प्रामाणिक आणि मार्मिक चित्रण करते. मुंबईच्या चाळीतील जीवन, बदलते सामाजिक-सांस्कृतिक संदर्भ आणि तरुण मनातील भावनिक हुंदके यांचे प्रभावी चित्रण या कादंबरीत आहे. कादंबरीतील नायकाच्या वरवर निरर्थक वाटणार्या कृती हळूहळू चिंतनशील आणि अस्तित्वाच्या शोधाकडे वळतात, ज्यामुळे ही कादंबरी नव्या पिढीचा सशक्त आवाज मानली जाते. प्रदीप कोकरे यांचे लेखन ग्रामीण आणि शहरी जीवनातील बारकावे, तसेच आधुनिक तरुणांच्या भावनांचे गहन चित्रण करते. त्यांची साधी; पण प्रभावी लेखनशैली वाचकांना अंतर्मुख करते.
युवा पुरस्कारासाठी मराठी भाषेतील निवड साहित्य मंडळामध्ये ख्यातनाम साहित्यिक अविनाश कोल्हे, इंद्रजित भालेराव आणि डॉ. रणधीर शिंदे यांचा समावेश होता.
‘पांधीअडो’ हा मंथन बचाणी यांनी लिहिलेल्या सिंधी कवितांचा जिवंत संग्रह आहे. मंथन बचाणी हे मुंबईचे आहेत. त्यांचा कविता संग्रह अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचावा यासाठी कवीने हे पुस्तक सिंधी देवनागरी आणि अरबी लिपीमध्ये केलेले आहे.
डॉ. सुरेश सावंत हे मराठीतील ज्येष्ठ बालसाहित्यकार आणि कवी असून, त्यांच्या ‘आभाळमाया’ या कविता संग्रहास 2025 सालचा मराठी भाषेसाठीचा बालसाहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. डॉ. सावंत यांच्या लेखनाची भाषा अत्यंत साधी, भावपूर्ण आणि कल्पनाशील असून, ती मुलांना सहज समजणारी आहे. त्यांच्या ‘आभाळमाया’ या कविता संग्रहातील रचना मुलांच्या कल्पनाविश्वाला साद घालणार्या आहेत. निसर्ग, आकाश, स्वप्ने आणि बालमनाच्या भावविश्वाशी निगडित असलेल्या या कविता मुलांना आनंद, समज आणि सौंदर्यद़ृष्टी देतात. त्यांच्या कविता लयबद्ध व सहज असून, त्यामुळे त्या मुलांना आवडतात आणि आठवतात. डॉ. सावंत हे केवळ कवी, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे साहित्य संशोधकही आहेत. त्यांनी ‘बालसाहित्याचा इतिहास’, ‘आंबेडकरी साहित्य’, ‘समाजपरिवर्तनाचे साहित्य’ अशा अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन केले आहे. त्यांच्या ‘नंदादीप’, ‘टिंबूपट’ यासारख्या पुस्तकांनी वाचकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे.
बाल पुरस्कारासाठी मराठी भाषेतील निवड साहित्य मंडळामध्ये एकनाथ आव्हाड, सोनाली नवांगुळ आणि लक्ष्मण कडू यांचा समावेश होता.