

Sadabhau Khot farmers support
कुरुंदवाड : राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देणे अत्यावश्यक आहे, कारखाना बंद होण्याच्या आतच शेतकऱ्यांना दुसरा हप्ता मिळाला पाहिजे, असे ठामपणे हेरवाड येथे बोलताना विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी ऊस दरासंदर्भात स्पष्ट भूमिका मांडत शेतकरी हित जोपासणाऱ्या संघटनांना पाठिंबा जाहीर केला.
शिरोळ तालुक्यात नुकत्याच झालेल्या ऊस परिषदेच्या पार्श्वभूमीवर ऊस दराचा मुद्दा पुन्हा एकदा गाजू लागला आहे. या परिषदेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रति टन ऊसाला ३७५१ रुपये दर जाहीर करण्याची मागणी केली होती. या मागणीवर प्रतिक्रिया देताना विधान परिषदेचे आमदार आणि शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी हेरवाड येथे महत्त्वाचे वक्तव्य केले.
खोत म्हणाले, “अनेक कारखाने दोन ते तीन हप्त्यांमध्ये पैसे देतात, त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळतो असे कारखानदारांना वाटते; पण प्रत्यक्षात तसे नाही. शेतकऱ्यांचे वर्षभराचे नियोजन करता यावे म्हणून त्यांना संपूर्ण एफआरपी एकाचवेळी मिळणे गरजेचे आहे. साखर आणि बाय-प्रॉडक्टचे दर सध्या वाढले आहेत. त्यामुळे कारखाना बंद होण्याच्या आतच दुसरा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. नफा वाढत असताना शेतकऱ्यांचा वाटा कमी ठेवणे योग्य नाही.”
ऊस दराच्या मागणीविषयी बोलताना खोत यांनी स्पष्ट केले, “वेगवेगळ्या संघटनांच्या विविध मागण्या आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या हिताची जी मागणी असेल, त्या प्रत्येक मागणीला माझा ठाम पाठिंबा राहील. शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवूनच सर्व निर्णय घेतले गेले पाहिजेत.आमदार खोत यांच्या या विधानामुळे ऊस दरासंदर्भातील चर्चा पुन्हा एकदा तीव्र होण्याची चिन्हे आहेत. आगामी गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या भूमिकेकडे शेतकरी, साखर कारखानदार आणि राजकीय वर्तुळातही उत्सुकतेने पाहिले जात आहे.